पाचगाव येथील प्रकार : फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी, प्रकरण रेतीच्या अवैध उत्खननाचे वरठी : पाचगाव रेती घाटावरुन नियमित सुरु असलेल्या अवैध रेती चोरांच्या विरोधात गावकऱ्यांनी दंड थोपटले आहे. यासंबंधी झालेल्या ग्रामसभेत रेती माफियांवर कारवाई करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन रेतीचे अवैध उत्खनन बंद करण्यात यावे असा ठराव पारित करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित विभागाला ठरावाची प्रत देण्यात आली आहे. आता यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दोन महिन्यापासून पाचगाव येथील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्यांना यावेळी सत्तेपासून हद्दपार व्हावे लागले. सत्तेत येण्यासाठी प्रयत्नरताच्या हाती प्रथमच सत्तेची किल्ली मिळाली. पण त्यांना ते चालवणे जमले नाही. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणाचे पडसाद त्यांच्या संबंधावर पडले आणि त्याचेच परिणाम म्हणून गावात सुरु असलेले अवैध रेती उत्खननाच्या तक्रारीवरुन दिसून येते.गावाला लागुन सुरु नदी वाहते. या नदीच्या पात्रात गावाला पिण्याचे पाणी पुरवठा योजनेचे पम्पहाऊस आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे शेत नदीपात्राला लागून असल्यामुळे नदीच्या पाण्यामुळे शेतकरी सुखावत होता. पण नियमित होणाऱ्या अवैध रेती उत्खननामुळे नदीचे पात्र धेक्यात आले आहे. पाणी पुरवठा योजनेच्या पम्पहाऊस जवळची रेती उपसल्यामुळे पम्पहाऊस धोकादायक स्थितीत आहे. उत्खननामुळे नदीच्या पात्रातील रेतीचे प्रमाण कमी झाले. यामुळे नदीत साठवून असणाऱ्या पाण्याची पातळी कमी झाली. नदीच्या काठावर बसलेल्या गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अनेक दिवसापासून या घाटचे लिलाव झाले नाही. पण रेतीचे उत्खनन नियमित सुरु आहे. गावातून दररोज शेकडो वाहनाने रेती चोरी सर्रास सुरु आहे. यामुळे गावअंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. दिवसभर रात्र बेभान धावणाऱ्या वाहनामुळे गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. बेभान धावणाऱ्या रेतीच्या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यांच्या कर्कश आवाजामुळे जिवन जगने कठीण झाले आहे. रेती चोरावर आळा न घातल्यास भविष्यात वाईट परिणाम भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यासंदर्भात संतुलाल गजभिये यांनी ग्राम सभेत रेती चोरावर कारवाईचा मुद्दा उचलून धरला व त्यांच्या मुद्याला श्रीराम भिवगडे यांनी अनुमोदन दिले. यावेळी सभेला उपस्थित ग्रामस्थांनी पाचगाव रेती घाटावरुन सुरु असलेल्या रेती चोरांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन कडक शासन होण्याचा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. (वार्ताहर)
तस्करी थांबविण्यासाठी ग्रामसभेचा ठराव
By admin | Updated: February 10, 2016 00:41 IST