मोरेश्वर सुखदेवे : जे. एम. पटेल महाविद्यालयात वार्षिक दिन कार्यक्रमभंडारा : आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय मोठे हवे, जर तुमचे ध्येय मोठ आणि विचार उच्च असतील तर आयुष्यात मोठे बदल घडू शकतात आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात मोठी उंची गाठू शकाल. कारण मोठ्या ध्येयाला जोडून मोठ्या कल्पना, मोठ्या योजना आणि मोठे यश येते असा मोलाचा सल्ला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक डॉ. मोरेश्वर सुखदेवे यांनी दिला. स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वार्षिक दिन समारोहात ते बोलत होते. ज्या महाविद्यालयात आपले शिक्षण झाले त्याच महाविद्यालयाच्या समारोहात अतिथी म्हणून बोलताना विशेष अभिमान व आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे चाळीस वर्षे जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी महाविद्यालयाला पुन्हा काही योगदान देण्याचा मानस व्यक्त केला. विशेषत: महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचा त्यांनी प्रस्ताव दिला.प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी हा दिवस विशेष आहे कारण महाविद्यालयाचे दोन माजी विद्यार्थी डॉ. सुखदेवे आणि सुमीत हेडा व्यासपिठावर अतिथी म्हणून उपस्थित आहेत, याचा आवर्जून उल्लेख केला. ह्या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे गोंदिया शिक्षण संस्थेचे आश्रयदाते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा साठावा वाढदिवसाचा योगही जुळून आला आहे. महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाचा व सर्वच क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा त्यांनी आपल्या भाषणात आढावा घेतला. प्राचार्य डॉ. ढोमणे यांनी महाविद्यालय परिसरात अत्याधुनिक जलदगती वाय-फाय सेवेची सुरुवात झाल्याची घोषणा केली. दुसरे अतिथी नागपुर विद्यापिठाचे रासेयो समन्वयक डॉ. भाऊ दायदार यांनी महाविद्यालयाच्या चौफेर प्रगतीचे विशेष कौतुक केले व सर्वच समाजभिमुख प्रकल्प राबविण्यात महाविद्यालय विद्यापिठातील आघाडीचे महाविद्यालय असल्याचा उल्लेख केला. चार्टर्ड अकाउंटंट व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुमीत हेडा यांनी आजच्या काळात अनुरुप अशा कौशल्याची जोड आपल्या पदव्यांना देणे अत्यंत आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. यशाच्या शिडीवर चढताना सामाजिक व नैतिक मुल्यांची कास सोडू नका असेही आवाहन त्यांनी केले.गोंदिया शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मुकेश पटेल यांनी महाविद्यालयातील प्रत्येक क्षणाचा पुरेपुर उपयोग करुन स्वत:ला आयुष्यातील आवाहनासाठी तयार करा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.समारोहात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विजेत्यांना व गुणवत्ताधारकांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. समारंभापूर्वी पाहुण्यांनी महाविद्यालयातील कॅफे जेएमपीसी या उपहारगृहाचे उद्घाटनही झाले. खा. पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षारोपण तसेच विभिन्न उपक्रम राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. वार्षिक दिनाचे प्रभारी डॉ. कार्तिक पणीकर यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. उमेश बन्सोड तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. चानखोरे हे देखील मंचावर उपस्थित होते. संचालन शाम शेख, कल्याण लांजेवार, रजनी वावरे यांनी प्रा.डॉ. अमोल पदवाड व प्रा. सुमंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. डॉ. प्रदीप मेश्राम व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच रासेयो व एनसीसीचे स्वयंसेवक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
यशस्वी होण्यासाठी ध्येयाची उंची आवश्यक
By admin | Updated: February 20, 2017 00:17 IST