१ नोव्हेंबरला मतदान, २ ला मतमोजणी : लाखनी, मोहाडी, साकोली, लाखांदुरात राजकीय मोर्चेबांधणीला आला वेगभंडारा : लाखनी, मोहाडी, साकोली, लाखांदूर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतमध्ये होताच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू होती. दरम्यान मंगळवारला राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. यात चारही तालुका मुख्यालयी १ नोव्हेंबर रोजी मतदान तर २ रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेने मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महाराष्ट्र नगर पालिका निवडणूक नियम १९६६ च्या नियम ४ व ५ अन्वये जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनंतर मंगळवारी सायंकाळी उशिरा मोहाडी, लाखनी, लाखांदूर व साकोली नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. या चारही तालुका मुख्यालयी एकाच दिवशी मतदान घेण्यात येणार आहे. मोहाडी नगर पंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुमसरचे उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना नियुक्त केले असून मोहाडीचे तहसीलदार तथा प्रशासक जयराज सुर्यवंशी हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. लाखनी नगर पंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे यांना नियुक्त केले असून लाखनीचे तहसीलदार तथा प्रशासक डी.सी. बोबांर्डे हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील.साकोली नगर पंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांना नियुक्त केले असून साकोलीचे तहसीलदार तथा प्रशासक शोभाराम मोटघरे हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. लाखांदूर नगर पंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जी.जी. जोशी यांना नियुक्त केले असून लाखांदुरचे तहसीलदार तथा प्रशासक विजय पवार हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील.मोहाडी, लाखांदूर, साकोली आणि लाखनी येथे प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. आरक्षण सोडती बाबतची माहिती सबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचा बिगूल वाजला
By admin | Updated: September 30, 2015 00:47 IST