लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा नगरपरिषदेकडे स्वतःचे अद्यावत अग्निशमन केंद्र उपलब्ध नव्हते. नगरपालिका प्रशासनाने अग्निशमन केंद्र बांधकाम करणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधकाम व अग्निशमन वाहन खरेदीसंबंधीचा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठविला होता. त्या प्रस्तावास नुकतीच प्रशासकीय व आर्थिक मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यामुळे भंडारा नगरपरिषदेचे अग्निशमन विभाग सुसज्ज होण्यास मदत होणार आहे.
भंडारा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने डिसेंबर २०२३ मध्ये राज्य शासनाकडे अग्निशमन केंद्र बांधकाम करणे, अग्निशमन कर्मचारी व अधिकारी यांचे निवासस्थान बांधकाम करणे व अग्निशमन वाहन खरेदी करणे आदींसाठी एकूण १२.८८ कोटी रकमेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता; परंतु सदर योजनेमध्ये शासनाने आर्थिक मर्यादा निश्चित केली असल्याने एफएस-आयव्ही प्रकारचे अग्निशमन केंद्र बांधकाम करण्यासाठी २० लाख व अग्निशमन वाहन खरेदीसाठी ८१ लाख, असा एकूण १ कोटी ७१ लाख रुपयांस मंजूर करण्यात आले यामध्ये नगरपरिषदेला वेगळयाने स्वःहिस्सा १९ लाख रुपये भरावा लागणार आहे. नगर विकास विभागाने १.९० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी प्रदान केली आहे.
वाढत्या शहरीकरणाला मिळणार अग्निसुरक्षाभंडारा शहरात अग्निशमन सेवा बळकट होईल. आपत्कालीन घटनांमध्ये वेगाने आणि प्रभावी प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर व नागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत गरजेची होती.
जुन्या जलशुद्धीकरण केंद्रात होणार बांधकामनगरविकास विभागाचे ०९ ऑक्टोबर २०२४ व २४ मार्च २०२५ च्या शासन निर्णयान्वये अग्निशमन केंद्र बांधकाम, निवासस्थान व वाहनाच्या निधीस प्रशासकीय व आर्थिक मंजुरी प्रदान केली आहे. नगरपरिषदेच्या जुन्या जलशुद्धीकरण केंद्रात एफएस-आयव्ही प्रकारचे अग्निशमन केंद्र बांधकाम करण्यात येणार आहे. अग्निशमन वाहन चेसीस खरेदी व बांधणीचे काम राज्य शासनस्तरावर होणार आहे.
वेळेत बांधकाम करण्याची जबाबदारी पालिकेचीनवीन अग्निशमन केंद्र आणि वाहन उपलब्ध झाल्याने शहरातील नागरिकांना सुरक्षिततेचा मोठा आधार लाभणार आहे. नगरपरिषदेने आता तातडीने पुढील कार्यवाही करून काम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
"अग्निशमन विभाग अद्यावत व बळकटीकरण करण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या निधीमुळे अग्निशमन केंद्र तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे."- करणकुमार चव्हाण, मुख्याधिकारी, नगरपरिषद, भंडारा.
"अग्निशमन केंद्र तयार झाल्यास विभागास अधिक भक्कमपणा लाभणार आहे. याशिवाय नव्या वाहनामुळे अग्निशमन दलाच्या ताफ्याचा विस्तार होण्यास लाभहोईल. त्याचा फायदा नगरपरिषद क्षेत्रा-सोबत परिसराला होण्यास मदत मिळेल."- समीर गणवीर, अग्निशमन अधिकारी, नगरपरिषद, भंडारा.