साकोलीतील प्रकरण मुंबईत : नगर पंचायत की नगर परिषद याबाबत संभ्रम कायमसाकोली : नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. नगरपंचायतीमध्ये १७ नगरसेवक प्रतिनिधीत्व करणार आहेत. आरक्षण जाहिर होताच बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली आहे. ५० टक्के आरक्षणामुळे नऊ महिला सदस्य राहणार असल्याने राजकीय पक्षाचे पदाधिकारी महिला उमेदवार, कार्यकर्त्यांची चाचपणी करीत आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान राज्य शासनाने साकोली ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा दिला. तहसिलदारांची प्रशासक म्हणून नगरपंचायतीचा प्रभार सोपविला. सप्टेंबर महिन्यात नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने निवडणूक आयोगाने नगरपंचायतीची घोषणा करण्यासाठी तयारी केली. नगरपंचायतीच्या प्रभागाचे प्रारूप तयार करून २० आॅगस्ट रोजी आरक्षण काढण्यात आले. आरक्षणानंतर राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी राजकीय पक्षांकडे फिल्डींग लावली आहे.नगर पंचायतही होणार असल्याची घोषणा होताच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविता न आलेल्या इच्छुकांनी नगरपंचायत उमेदवारीकडे लक्ष केंद्रीत करून तयारी सुरू केली आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेवून निवडणुकीच्या रणांगणात आपण राहणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या इच्छुकांनी सांगितले आहे. आरक्षण जाहिर होताच जनसंपर्क वाढविला आहे. यामुळे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला धक्का बसल्यामुळे नगरपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी भाजपचे जोरकस प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. या आखाड्यात कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)नगरपरिषदेच्या प्रस्तावाचे काय?शासनाने साकोली नगरपंचायत घोषित केली व प्रभागनिहाय आरक्षण काढण्याच्या दोन दिवसांपुर्वी साकोलीला नगरपरिषदेचा दर्जा देण्यासंदर्भात पत्र प्राप्त झाले. पत्र येताच तालुका प्रशासनाने साकोली नगरपरिषदेचा प्रस्ताव तात्काळ भंडारा व भंडारा येथून मुंबई मंत्रालयात पाठविला. दि. २५ रोजी सदर प्रस्तावावर नगरविकास मंत्र्यांच्या सचिवांची सही झाली असून या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही होणार असून दि.२७ ला हा प्रस्ताव राज्यपालाकडे जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साकोलीची निवडणूक नगरपंचायतीच्या की नगरपरिषदेची याबाबत नागरिक व इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
उमेदवारीसाठी इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी
By admin | Updated: August 26, 2015 00:28 IST