आॅनलाईन लोकमतभंडारा : भिलेवाडा येथील भटक्या विमुक्त समाजातील बचत गटाला स्वत:चा व्यवसाय करता यावा यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बँक आॅफ इंडियाने एक लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केले. मंगळवारला जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते या बचतगटाला एक लाख रूपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.भंडारा जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून भटके विमुक्त समाज हा एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी भटकंती करीत आहे. या समाजातील लोकांनी आतापर्यंत स्थायी वास्तव्य केले नाही. या समाजातील लोकांचे स्थायी वास्तव्य नसल्यामुळे व त्यांचे कागदोपत्री पुरावे शासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे या समाजातील लोकांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे या समाजातील लोक आताही निरक्षर व हालाखिची परिस्थिती जगत आहे.भंडारा शहराजवळील दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले भिलेवाडा या गावाजवळ भटक्या समाजातील लोक वास्तव्यासाठी आहेत. भिलेवाडा येथे वास्तव्यास येण्यापूर्वी या समाजातील स्त्रिया व पुरुष बहुरूपी सोंग घेऊन गावांगावामध्ये भिक्षांदेही करून स्वत:च्या कुटूंबाचे उदरनिर्वाह करीत असत. भिलेवाडा येथे वास्तव्यास असलेल्या वस्तीमध्ये १२ कुटूंब असून १४ स्त्रिया व १६ पुरूष व लहान मुले आहेत. या वस्तीमधील अंकूश तांदुळकर यांच्या पुढाकाराने या वस्तीमधील स्त्रिया व पुरूषांनी बहुरूपियांचे सोंग करून भिक मागणे सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केलेला आहे. हा समाज लोखंडी टेबल, खुर्च्या, लोखंडी पलंग, चादरी आदी तयार करून गावोगावी विकतात व स्वत:चा उदरनिर्वाह करतात.भिलेवाडा येथे विमुक्त भटका समाज वास्तव्य करीत असून त्यांची परिस्थिती हालाखीची आहे. या वस्तीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी सरोजिनी खोब्रागडे तसेच पंचायत समितीच्या तालुका गटसमन्वयक माधूरी खांडरे यांनी जावून महिलांशी संवाद साधून व महिलांना मार्गदर्शन केले. तेथील महिलांचा स्वयंसहाय्यता समुह तयार करण्यात आला.या गटामध्ये १० महिला असून शालुबाई तांदूळकर, पिंकी तांदूळकर, मनिषा तांदुळकर, नंदना तांदूळकर, नर्मदा तांदुळकर, इंदिरा तिवसकर, माधूरी तिवसकर, बेबी तिवसकर यांचा समावेश करण्यात आला आहे. या स्वयंसहाय्यता समुहाकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून खेळते भांडवल १५ हजार रूपये देण्यात आले. आर्थिक सहाय्य देण्याकरीता एक लाख रूपयांचे कर्ज प्रस्ताव बँक आॅफ इंडिया भंडारा येथे सादर करण्यात आला. तो मंजूर करण्यात आला असून मंगळवारला जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते हा धनादेश त्यांना देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रत्नाकर खांडेकर, बँक आॅफ इंडियाचे मुख्य प्रबंधक रमेश हसाणी, अनिलकुमार श्रीवास्तव व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी सरोजिनी खोब्रागडे उपस्थित होते.
भटक्या समाजातील महिला बचत गटाला आर्थिक पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:20 IST
भिलेवाडा येथील भटक्या विमुक्त समाजातील बचत गटाला स्वत:चा व्यवसाय करता यावा यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बँक आॅफ इंडियाने एक लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केले.
भटक्या समाजातील महिला बचत गटाला आर्थिक पाठबळ
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सुपूर्द केला धनादेश