तुमसर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्सचा टायर फुटल्याने भरधाव वाहन अनियंत्रित होवून शेतशिवारात उलटले. थरकाप उडविणाऱ्या अपघातात ११ लग्न वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. हा अपघात सकाळी ११.३० च्या सुमारास खैरलांजी (तुमसर) शिवारात घडला. जखमींवर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.सिहोरा येथील बाबुराव चौधरी यांचेकडील लग्न वरात मिटेवानी येथील नेवारे यांचेकडे जाण्याकरिता ट्रॅक्समधून निघाली. ट्रॅक्समध्ये १८ ते २० प्रवाशी होते. तुमसर-वाराशिवनी आंतरराज्यीय महामार्गावरील खैरलांजी शिवारात ट्रॅक्सचा मागील टायर फूटला. भरधाव ट्रॅक्स अनियंत्रित झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारी वाहन उलटले. यात ११ प्रवाशी गंभीर जखमी झाले. वाहनचालक अपघातानंतर फरार झाला. खैरलांजी येथील ग्रामस्थ मदतीकरिता धावले. त्यांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात जखमींना वाहनातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात जखमीत कविता नेवारे (२३) रा. सुकळी, शशिकला चौधरी (४०) रा. कवलेवाडा, पमा चौधरी (२३) सिहोरा, कसराबाई चौधरी (५५) सिहोरा, आईसा राऊत (१२) सिहोरा, राधिका बागडे (६५) सिहोरा, रमाकांत नेवारे (४५) सिहोरा, मिरनबाई नेवारे (६०) गोंडखैरी (कळमेश्वर), धनुबाई कोहळे (४०) मुंडीपार, भारती वाघाये (१४) मुंडीपार, निमा वाघाडे (२२) मुंडीपार यांचा समावेश आहे. अवैध प्रवासी वाहनामुळे येथे प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. तपास तुमसर पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
भरधाव वाहन उलटून ११ महिला जखमी
By admin | Updated: February 20, 2015 00:24 IST