पवनी : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्याबाबत शासन व प्रशासन उदासीन आहे. समस्या दुर्लक्षित ठेवून धरणात पाणी वाढवून प्रकल्पग्रस्तांचे जीवन अस्ताव्यस्त केल्या जात आहे. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक आमदारांचे जनसंपर्क कार्यालय व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्यांनुसार मौजा खापरी (रेहपाडे) गावाची थांबविण्यात आलेली पुनर्वसन प्रक्रिया सुरु करण्यात यावी. खापरी गाव उमरेड -कऱ्हांडला अभयारण्यात येत असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. नेरला गावाची पुनर्वसन प्रक्रिया सुरु करावी. मौजा सुरबोडी गावाची ८० टक्के शेतजमीन अधिग्रहीत झाली. त्यामुळे गावठाणाची पुनर्वसन प्रक्रिया त्वरीत सुरु करावी, अशी मागणी आहे.नेरला उपसिंचन करीता जमीन अधिग्रहीत करण्यात आली. त्यासाठी पुनर्वसन अनुदान व पॅकेज त्वरीत देण्यात यावे. मौजा गायडोंगरी - कवडसी, उमरेड, कऱ्हांडला अभयारण्यात येत असल्याने त्या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांचे प्रत्येक स्वतंत्र कुुटुंबाला नोकरी ऐवजी रु. ५ लक्ष देण्यात यावे, पुनर्वसन होईस्तोवर धरणातील पाण्याची पातळी २४१.५ मिटर तलांकाच्या पुढे वाढविण्यात येवू नये. अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रकल्पबाधीत गावातील नागरिकांना अन्नधान्य व केरोसीन तेलाचे वाटप करण्यात यावे. प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी मासेमारीचे अधिकार देण्यात यावे. जिल्हा पुनर्वसन समितीचे गठण करण्यात यावे. शासनाच्या नाविण्यपूर्ण योजनाअंतर्गत दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन या योजना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्तांसाठी राबविण्यात याव्यात, आदी मागण्या असलेले निवेदन गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर व मच्छीमार कृती समितीचे संयोजक राम बांते यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना व तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चामध्ये नितीन कोदाने, तुलशीदास भोयर, भागवत दिघोरे, प्रदीप गजभिये, जितेंद्र रेहपाडे तसेच खापरी, गायडोंगरी, परसोडी, नेरला येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर मच्छीमार नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका / शहर प्रतिनिधी)
शेतकरी, शेतमजुरांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 00:36 IST