शेतकरी चिंतातुर : भाजीपाला पिकाचे दर घसरले
पवनारा : तुमसर व मोहाडी तालुक्यातील पवनारा, बघेडा, लोहारा, सोरणा, जाम, लंजेरा, देऊळगाव आदी गावात शेकडो एकरात टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकाची लागवड आहे, परंतु बाजार भाव घसरल्याने खर्च जास्त मोबदला शून्य हे वास्तव आहे.
शीर्षक हाच वास्तव आहे
चाळीस हजारांपासून एक लाख किलोपर्यंत टोमॅटोचे बियाणे विकत घेऊन रोपवाटिका तयार करून लागवड करतात, तेव्हापासून शेतकऱ्यांना अतोनात खर्च येतो. रासायनिक खत, कीटकनाशक, मजुरी आदी खर्चाने शेतकऱ्यांचे खिसे खाली होतात. आशा एकच असते, पीक विकून दोन पैसे मिळतील, परंतु तेही नाही. कारण सध्या टोमॅटोचा भाव ३० ते ५० रु. कॅरेट बाजारात आहे, जवळपास एक ते दीड रु. किलो. त्यामागेही तोडण्यासाठी मजुरी, बाजारात नेण्याकरिता गाडी भाडे, बाजार चिठ्ठी, हमाली अशा विविध खर्चाने शेतकऱ्याच्या हातात एकही पैसा उरत नाही व त्याचा माल फुकट जातो, काहींचा टोमॅटो शेतातच सडतोय, याकडे शासनाचे लक्ष जाईल काय?
त्याला कष्टाचा मोबदलाही धड मिळत नाही
टोमॅटोप्रमाणे पत्ताकोबी, वांग्याचेही बेहाल आहेत, पीक विकावे तरी कुठे, या विवंचनेत शेतकरी गुंतला असून, कर्जबाजारी झाला आहे. आता करावे तरी काय, असे प्रश्न शेतकऱ्यांनपुढे सतत भेडसावत आहेत.
शेतकरी सामोर न जाता मागेच येत आहे. पाच एकर जमिनीच्या उत्पन्नात शेतकरी वर्षभर परिवारासह उदरनिर्वाह करू शकत नाही, उलट मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होतो. कारण एक रुपयाचे उत्पन्न तर दीड रुपये खर्च, अशी स्थिती आहे. शंभरातून दोन शेतकऱ्यांना फायदा व अठ्ठ्याण्णवला नुकसान म्हणून शेतकऱ्यांची लेकरं लहान-मोठी नोकरीच बरी म्हणतात.
शेतकऱ्यांच्या वाली कुणी नाही, त्यांचे अश्रू पुसायला कोण धावेल, कुणी नाही, उलट एखाद्या वेळी भाजीपला बाजार भाव वाढले, तर जिकडे-तिकडे हाहाकार, याबाबत पवनारा, बघेडा, लोहारा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या मुखातून वास्तविकता ऐकायला मिळाली आहे.