लाखांदूर : नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच तालुका प्रशासनाने ६६ पैसेवारी काढली. त्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांसोबत चर्चा करून मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या उपस्थितीत पंचनामे केले. त्यानुसार काढण्यात आलेल्या पैसेवारीत मोठी तफावत आढळून आल्याने शेतकऱ्यांनी या आणेवारीव आक्षेप नोंदविला आहे.तहसील कार्यालयामार्फत यावर्षी ६६ पैसे पीक पैसेवारी काढण्यात आली. परंतु सततची नापिकी व उत्पादन खर्च यामुळे त्रस्त शेतकरी शासनाची ही नजरअंदाज पैसेवारी मान्य करण्यास तयार नाही, त्यामुळे तहसीलदार विजय पवार यांच्याशी पारडी, दहेगाव, मुरमाडी, तावशी, जैतपूर या गावातील शेतकऱ्यांनी चर्चा करून पारडी शिवारातील धानपिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आणेवारी काढण्याचा आग्रह धरला. मंडळ अधिकारी गेडाम व तलाठी सांगोळे, सरपंचा स्रेहलता गडपायले, उपसरपंच धर्मपाल किरसान, चंद्रशेखर टेंभूर्णे, मानविर दहिवले, मनोज हुकरे, स्रेहलता चव्हाण, नारायण पारधी, शोभा कांबळे, जयप्रकाश उजवणे यांच्या शेतातील धानपिकांचे प्रात्यक्षिक करून नियमानुसार आणेवारी काढली. १० बाय १० च्या प्लॉटमध्ये धानाची मळणी केली असता १० किलो धान झाल्याचे उघडकीस आले. यावरून शासनाला सादर केलेली पैसेवारी ही चुकीची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावर आक्षेप घेतले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी लाखांदूर तालुक्यातील इंदोरा गावाला भेट देऊन आणेवारी काढली होती. त्यावेळी आणेवारी ११९ पैसे इतकी निघाली होती. (तालुका प्रतिनिधी)
पीक पैसेवारीवर शेतकऱ्यांचा आक्षेप
By admin | Updated: December 11, 2014 23:01 IST