सौर कृषिपंपात शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 06:00 AM2020-03-07T06:00:00+5:302020-03-07T06:00:12+5:30

करडी येथील दोन शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात वीज जोडणीसाठी महावितरणकडे डिमांड भरले होते. मात्र महावितरणकडून शेतकऱ्यांना विजेची जोडणी देण्यात आली नाही. उलट सौर पंपाचे कनेक्शन देवून फसवणूक करण्यात आली आहे. ऐन रबी हंगामात सौरपंप गत दोन महिन्यांपासून बंद पडल्याने सौरपंप दुरुस्तीसाठी कंत्राटदाराकडून टाळाटाळ होत आहे.

Farmers cheat in solar farms | सौर कृषिपंपात शेतकऱ्यांची फसवणूक

सौर कृषिपंपात शेतकऱ्यांची फसवणूक

Next
ठळक मुद्देरबी हंगाम संकटात : दोन महिन्यांपासून शेतकरी त्रस्त, कंत्राटदाराकडून टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी-पालोरा : शासनाकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महावितरणतर्फे सौर कृषीपंपाची योजना राबविण्यात येते. मात्र करडी येथे दोन वर्षांपासून सौर कृषीपंपासह वीज जोडणीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
करडी येथील दोन शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात वीज जोडणीसाठी महावितरणकडे डिमांड भरले होते. मात्र महावितरणकडून शेतकऱ्यांना विजेची जोडणी देण्यात आली नाही. उलट सौर पंपाचे कनेक्शन देवून फसवणूक करण्यात आली आहे. ऐन रबी हंगामात सौरपंप गत दोन महिन्यांपासून बंद पडल्याने सौरपंप दुरुस्तीसाठी कंत्राटदाराकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे करडी पालोरा परिसरातील असंख्य शेतकरी महावितरण कार्यालयाच्या कामकाजाने त्रस्त झाले आहेत.
दोन वर्षांपासून महावितरणकडे डिमांड भरुनही शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी ही पिके शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. डिमांड भरतांना महावितरणकडून जोडणी देण्याचे आश्वासन मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उसणवार करुन रबी हंगामातील विविध पिकांची पेरणी केली होती. मात्र ऐन हंगामात पिकांना पाणी मिळेनासे झाल्याने पिके वाळू लागली आहेत.
महावितरण कार्यालय कंत्राटदाराकडे बोट दाखवित आहेत. मात्र ज्या एजन्सीकडे कृषी पंपाचा ठेका दिला होता. तो ठेकेदार शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही. त्यामुळे कंत्राटदार आणि महावितरणच्या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
सदर प्रकाराविषयी करडी येथील विद्युत अभियंत्याना शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, तुम्ही कंत्राटदारांना सांगा, ते दुरुस्ती करुन देतील अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास विद्युत कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पालोरा येथील सरपंच महादेव बुरडे यांनी दिला आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत.

करडी परिसरातील शेतकऱ्यांना त्रास कमी व्हावा म्हणून शेतकऱ्यांचे डिमांड आपण उपविभागीय अभियंता कार्यालय मोहाडी येथे पोच केले. सौरपंप बंद पडल्यास शेतकऱ्यांना आॅनलाईन तक्रारीची सुविधा आहे.
- संजय भुते, कनिष्ठ अभियंता शाखा करडी
आपणाकडे एकही ग्राहकांनी सौर पंप बंद असल्याचे कळविलेले नाही. परंतु लोकांच्या तक्रारीवरुन सौरपंपाशी संबंधित वरिष्ठांशी बोलून पुढील निर्णय घेण्यात येईल.
- सुनील माहुर्ले, उपविभागीय विद्युत अभियंता, मोहाडी

Web Title: Farmers cheat in solar farms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.