संजय मते लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव (भंडारा) : कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ रामटेकद्वारा स्थापित मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे स्थित असलेल्या श्री संत गजानन महाराज प्रशासकीय महाविद्यालय कांद्री येथील परीक्षा केंद्र तीन वर्षासाठी रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. मोबाइलवरून सामूहिकपणे कॉपी केली जात असल्याचे हे प्रकरण 'लोकमत'ने उजेडात आणले होते. त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.
कांद्री येथील प्रशासकीय महाविद्यालयात रामटेक विद्यापीठामार्फत बीए आणि एमए महाविद्यालय सुरू करण्यात आले होते. त्या प्रकरणी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या परीक्षा या सेमिस्टर वाईज होत असतात. येथील प्रशासकीय महाविद्यालय येथे बीएच्या हिवाळी परीक्षा सुरू असताना विद्यापीठाच्या भरारी पथकाने शेवटच्या पेपरला धाड घातली असता त्यामध्ये परीक्षा देत असलेल्या विद्यार्थी रूम नंबर तीन आणि चारमध्ये मोबाइलचा वापर करून सर्रासपणे कॉपी करताना भरारी पथकाला आढळून आले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठाने दाखल घेत एक चौकशी गठित करून अहवाल सादर करायला सांगितले होते.
गुण रद्द करून महाविद्यालयावर १ लाखाचा दंडबीए अंतिम वर्षाच्या सिव्हिल सर्व्हिसेस अँड लाइफ सव्र्व्हिसेस संबंधित तारखेच्या पेपरचे सर्व गुण रद्द करून पुढील सत्रात या विषयाची पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापिठाने दिले आहेत. तसेच, महाविद्यालयावर १ लाख रुपयांचा दंड ठोकण्यात आला असून येथील परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द करण्याचे आदेश विद्यापीठ गैरप्रकार चौकशी समितीचे सदस्य सचिव डॉ. केशव मोहरीर यांनी काढले आहेत.
'लोकमत'च्या हाती लागली होती चित्रफीतवर्गखोलीतील सर्वच विद्यार्थी सर्रास मोबाइलवरून कॉपी करीत आहे, अशी तीन मिनिटांची व्हिडीओ चित्रफीतच 'लोकमत'च्या हाती लागली होती. 'लोकमत'ने हे प्रकरण सातत्याने लावून धरले होते. विद्यापीठाकडेही पाठपुरावा केला होता. मात्र महाविद्यालयाकडून हे खोटे ठरविण्याचा प्रयत्न होत होता. एवढेच नाही, तर दबाव आणण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र, कुलगुरूंनी आता हे परीक्षा केंद्रच रद्द केल्याने या गैरप्रकारावर शिक्कामोर्तब झाले आहे.