बजरंग दलाची मागणी : तहसीलदारांना निवेदनसाकोली : गोवंशाची होणारी कत्तल थांबावी आणि गोवंश हत्त्या प्रतिबंधक कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी बजरंग दलाच्या वतीने तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी साकोली येथील लहरीबाबा मठ परिसरात गोवंशाची कत्तल करून मांस विकताना एका विशिष्ट समुदायाच्या लोकांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. याची तक्रार साकोली पोलिस ठाण्यात करण्यात आली. मात्र पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई न करता, थातुरमातूर कारवाई करून आरोपीला सोडून देण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे गोहत्त्या कायद्याचे योग्यरित्या अंमलबजावणी न झाल्याचे स्पष्ट होते. पोलिसांकडून या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, पकडण्यात आलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, कारवाईत टाळाटाळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे, गोवंश कत्तलीचे अगोदर देण्यात आलेले परवाने रद्द करावे, शासनाने प्रत्येक तालुका व ग्रामस्तरावर प्राणी क्रूरता निवारण समिती स्थापन कराव्यात आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.शिष्टमंडळात बजरंग दलाचे प्रखंड अध्यक्ष शिवाजीराव ब्राम्हणकर, प्रखंड संयोजक भुषण करंजेकर, प्रखंड सहसंयोजक गोलू धुर्वे, नितीन खेडीकर, मंदार खेडीकर, मनीष कापगते, गजेंद्र लांजेवार, प्रेमराज सोनवाने, नंदागवळी, दीपक हिवरे, गीतेश लांजेवार, हेमंत चांदेकर, आशिष भिवगडे, राहूल मेश्राम, अतुल पंचबुद्धे, अतुल लाडे, रोहित गुप्ता, स्वामी नेवारे, अविनाश मेश्राम, तिलक कापगते, सचिन राऊत, संदीप साखरकर, तांडे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करा
By admin | Updated: July 17, 2015 00:36 IST