लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध पाणीपुरवठा योजनेंतर्गत मागील काही महिन्यांपासून थकीत व नियमित वीज बिलांचा ग्रामपंचायत प्रशासनाने भरणा केला नसल्याने तालुक्यातील एकूण ३ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. कारवाई तालुक्यातील वीज वितरण कंपनीने केली असल्याने तालुक्यातील ३ गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप केला जात आहे.तालुक्यातील मांढळ, तई (बुद्रुक) व डांभेविरली या तीन गावांत शासनाच्या विविध पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणी उपलब्ध केले जात आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील या ग्रामपंचायतींतर्गत पाणीपुरवठा योजनेचे एकूण ६ लाख ५१ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, सदर ३ गावांतील ग्रामपंचायतींनी मागील काही महिन्यांपासून थकीत व नियमित वीज बिलांचा भरणा न केल्याने वीज कंपनीने या तिन्ही गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील मांढळ, तई बुद्रुक व डांभेविरली या तीन गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान, स्थानिक लाखांदूर तालुक्यातील एकूण ८९ गावांतर्गत ६१ पाणीपुरवठा योजना असल्याची माहिती आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील बारव्हा वीज मंडळात १२, लाखांदूर वीज मंडळात १५, सरांडी बुद्रुक वीज मंडळात १० व विरली बुद्रुक वीज मंडळात २४, असे एकूण ६१ पाणीपुरवठा योजना असल्याची माहिती आहे. ६१ पाणीपुरवठा योजनेंतर्गत मागील काही महिन्यांपासून एकूण २८ लाख ७२ हजार रुपयाचे वीज बिल थकीत असल्याची माहिती आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यांत थकीत वीज बिलांचा भरणा न केल्यास वीज कंपनींतर्गत वीजपुरवठा खंडित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
६१ ग्रामपंचायतींतर्गत १०३ पथदिव्यांचे कनेक्शन- तालुक्यातील एकूण ६१ ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन असल्याची माहिती आहे. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी मागील काही वर्षांपासून या पथदिव्यांच्या थकीत व नियमित वीज बिलांचा भरणा न केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. थकीत व नियमित वीज बिलांचा भरणा न केल्यास तालुक्यातील थकीतदार ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांच्या वीजपुरवठा देखील खंडित केला जाण्याचे संकेत दिले जात आहे.