आॅनलाईन लोकमतभंडारा : आरोग्य विभाग जनजागृतीवर कितीही वारेमाप निधी खर्च करीत असलातरी निष्पाप गरीबांचा जीव आजारांमुळे जात असल्याच्या घटना नेहमी घडत असतात. अशीच घटना धारगाव येथे सोमवारी घडली. यात हिवतापाने ३४ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला तर, तिचे दोन्ही अपत्य नागपूरात उपचारार्थ दाखल आहेत. प्रियंका विनेश करवाडे रा. धारगाव, असे मृत विवाहितेचे नाव आहे.माहितीनुसार, प्रियंका यांची प्रकृती काही दिवसांपासून चांगली नव्हती. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्हा रुग्णालयांतही तपासणी व उपचार सुरु केला. मात्र तिला आराम झाला नाही. तिच्यावर मागील तीन दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असतानाच रविवारी प्रियंका यांची प्रकृती ढासळली. त्यांना पुढील उपचारार्थ नागपूर येथे दाखल करण्यात आले.वैद्यकिय चाचणीत त्यांना हिवताप झाल्याचे निष्पन्न झाले. हा रोग किटकजन्य आजार असल्यामुळे त्यांची लागण तिच्या दोन्ही मुलींनाही झाली. दरम्यान उपचारादरम्यान सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास प्रियंका यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या दोन्ही मुलींवर नागपूर येथील शासकीय वैद्यकिय रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्यामागे पती, सासु, सासरे, तीन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारला सकाळी १० वाजता धारगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल.जिल्ह्यात हिवताप विभागातर्फे दरवर्षी रक्त तपासणी मोहिम राबविली जाते. यावर जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे लक्षावधी रूपयांची उधळपट्टीही केली जाते. शहरात या कारवाईचा उदोउदो केला जात असला तरी ग्रामीण भागात स्वच्छतेच्या अभावामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. याचाच फटका ग्रामस्थांना बसतो.ममत्व हिरावलेसुखी संसाराची स्वप्न रंगवित असतानाच प्रियंका यांची प्राणज्योत आजारामुळे मालविली. त्यांना तीन मुली अपत्य रुपाने लाभल्यात. शेवटच्या क्षणी मृत्यूशी झुंज देत असताना जीवन हरले व मृत्यूचा विजय झाला. तिन्ही मुलींवरची आईची माया नियतीने क्षणात हिरावली. घटनेची माहिती धारगाव येथे कळताच परिसरात शोककळा पसरली.
धारगाव येथे हिवतापाने विवाहितेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:11 IST
आरोग्य विभाग जनजागृतीवर कितीही वारेमाप निधी खर्च करीत असलातरी निष्पाप गरीबांचा जीव आजारांमुळे जात असल्याच्या घटना नेहमी घडत असतात.
धारगाव येथे हिवतापाने विवाहितेचा मृत्यू
ठळक मुद्देनववर्षदिनी पसरली शोककळा: अपत्यांवर नागपुरात उपचार सुरूच