सात जणांविरुद्ध गुन्हे : आॅनलाईन बक्षिस ठरले महागातभंडारा : ईमेल आयडीला मोठे बक्षिस लागल्याचे आमीष दाखवून शहरातील उच्च विद्याविभुषीत डॉक्टराला महाठगांनी चक्क आठ लक्ष रुपयांनी गंडविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. अरुणकुमार महादेव डांगे असे डॉक्टरचे नाव असून या प्रकरणाची शहरात चर्चा होत आहे. जिल्ह्यात फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. भंडारा शहरातील गुरुदत्त मंगल कार्यालयाजवळ डॉ.अरुणकुमार डांगे यांचे खासगी रुग्णालय आहे. आरोपी मार्फ फिलीप यांच्या मोबाईलवर फोन करून तुमच्या ई मेल आयडीला बक्षिस लागले आहे. सदर रक्कम रिझर्व बँकेमार्फत तुमच्या खात्यात जमा करता येईल, अशी माहिती दिली. परंतु तुम्हाला आमच्या बँक खात्यात आॅनलाईन रक्कम जमा करावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार डांगे यांनी या टोळीतील समीर सिंग, सुरिंदर सिंग, क्रिष्णन, प्रदीप कुमार, कुमार सिंग राजीव यांच्या खात्यात ठराविक रक्कम भरली. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे आरोपींनी या बक्षिसाची रक्कम डांगे यांच्या बँक खात्यात जमा केली नाही. फसवणूक झाल्याचे डांगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी सात जणांविरुद्ध भादंवि ४२० कलमान्वये गुन्हा दाखल केला. या पूर्वी देखील अनेकांची फसवणूक झालेली आहे. (नगर प्रतिनिधी)
डॉक्टरला आठ लाखांनी गंडविले
By admin | Updated: July 10, 2014 23:26 IST