जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:00 AM2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:37+5:30

भंडारा येथील खात रोडवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आहे. जिल्हाभरातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचा संबंध या कार्यालयाशी येतो. गत अनेक वर्षांपासून सदर कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. गुरुवारी दुपारी या कार्यालयाला भेट दिली तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासूनच अव्यवस्थेचे दर्शन होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय असे फलक असलेल्या प्रवेशद्वाराजवळ अवकाळी पावसाने तळे साचले होते.

District Superintendent of Agriculture Office Rambhorase | जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय रामभरोसे

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय रामभरोसे

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यालय धुळीने माखले : ठिकठिकाणी फाईलचा खच, वीज तारा अस्ताव्यस्त, स्टोर रुमचा अभाव

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संपूर्ण जिल्ह्याच्या कृषी विभागाचा कारभार पाहणाऱ्या येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा कारभार रामभरोसे आहे. प्रवेशद्वाराजवळ साचलेले पाण्याचे डबके, आवारात अस्ताव्यस्त उभी असलेली वाहने, कार्यालय फाईलींचा खच आणि सर्वत्र पसरलेली धुळ असे चित्र गुरुवारी दुपारी २ वाजता दिसून आले. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या ओस असल्याने याबाबत विचारणा केली तर कृषीमंत्र्याच्या नागपूर बैठकीची तयारीत सर्व व्यस्त असल्याचे येथे उपस्थित एका कर्मचाऱ्याने सांगितले.
भंडारा येथील खात रोडवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आहे. जिल्हाभरातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचा संबंध या कार्यालयाशी येतो. गत अनेक वर्षांपासून सदर कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. गुरुवारी दुपारी या कार्यालयाला भेट दिली तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासूनच अव्यवस्थेचे दर्शन होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय असे फलक असलेल्या प्रवेशद्वाराजवळ अवकाळी पावसाने तळे साचले होते. तर प्रवेशद्वारातच बंद असलेले वाहन आणि दुचाकी अस्ताव्यस्त उभ्या होत्या. या वाहनांच्या गराड्यातून वळसा घेत दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा जीन्याजवळ विजेच्या तारांचे भेंडोळे दिसून आले. पायºयावरून चढताना प्रचंड धुळ दिसत होती. पायºयाप्रमाणे कार्यालयातही धुळीचे साम्राज्य दिसून आले. दुपारचे दोन वाजल्याचे घड्याळात दिसत असले तरी बहुतांश खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या.
या कार्यालयात ठिकठिकाणी अस्ताव्यस्त ठेवलेल्या फाईली दिसत होत्या. स्वच्छतेबाबत कोणतेही उपाय येथे दिसत नव्हते. उलट कार्यालय रस्त्यावर असल्याने धुळ येणारच असे समर्थन तेथे उपस्थित एका कर्मचाऱ्याने केले. विशेष म्हणजे जिल्हा अधीक्षक अधिकारी कार्यालय असल्याने या ठिकाणी जिल्ह्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या वारंवार बैठकी होतात. परंतु त्या संदर्भात कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही. कार्यालयाचे कोपरे जळमटांनी भरलेले होते. संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या कार्यालयाची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे लोकमतने केलेल्या स्टींग आॅपरेशनमुळे उघडकीस आले.
रिकाम्या टेबल, खुर्च्या पाहून येथे उपस्थित एका कर्मचाºयाला याबाबत विचारणा केली तर शुक्रवारी नागपूर येथे कृषीमंत्र्यांची बैठक असून या बैठकीच्या तयारीत सर्व व्यस्त आहेत. आज आमची धावपळ सुरु असल्याचे सांगितले तर जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण एका मिटींगमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. या कार्यालयाच्या अनेक सुरस कथा सांगितल्या जातात. येथे येणाºया शेतकºयांना सौजन्याची वागणूक मिळत नसल्याची ओरड कायम असते. याचा प्रत्यय गुरुवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीलाही आला. अवकाळी पावसाच्या नुकसानीसंदर्भात सर्वेक्षणाबाबत कुठलीही हालचाल दिसली नाही. एका कर्मचाºयाने लाखनी तालुका कृषी अधिकाºयाचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांच्याकडून माहिती घेण्याचा सल्ला दिला. एकंदरीत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय रामभरोसे असल्याचे दिसून आले.

चालकाअभावी वाहन जागेवरच उभे
संपूर्ण जिल्ह्याच्या कृषी विभागाचा कारभार नियंत्रित करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे वाहन कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच उभे होते. त्यावर मोठ्या प्रमाणात धुळ साचलेली होती. गेल्या कित्येक दिवसांपासून या वाहनाचा उपयोग झाला नसल्याचे दर्शनी परिस्थितीवरून दिसत होते. याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले. गत अनेक महिन्यांपासून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला चालक नसल्याचे सांगण्यात आले. चालकच नसल्याने हे वाहन तेथे कायमस्वरुपी उभे असते. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांशी संपर्क साधला असता चालक नसल्याने वाहन बंद असल्याचा दुजोरा देत लवकरच कंत्राटी वाहनचालकाची नियुक्ती करण्यात येईल. वाहन सुस्थितीत असल्याचे सांगण्यास मात्र ते विसरले नाही. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून वाहन जागेवरच उभे असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: District Superintendent of Agriculture Office Rambhorase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती