पालोरा (चौ.) : पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे गावाचा विकास रखडला आहे. गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गावातील नाल्या घाणीने तुडूंब आहेत. लक्षावधी रुपये खर्च करून विकत घेतलेले सौरउर्जेचे दिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे शोभेची वास्तू ठरत आहेत. येथील सरपंच संगीता गिऱ्हेपुंजे या मनाप्रमाणे खर्च दाखवीत असल्यामुळे ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.येथील सरपंचाच्या मनमर्जी कारभाराने सारेच त्रस्त झाले आहेत. सरपंच, उपसरपंच एका बाजूला तर सात सदस्य विरुद्ध बाजूने असल्यामुळे बिल पास करण्यात प्रशासकीय कामे करण्यात सरपंचाची गोची होत आहे. येथे महिला सरपंच असली तरी मात्र त्यांचे पतिदेव कारभार सांभाळीत असल्याचा आरोप आहे. उपसरपंच दिलीप धारगावे हे दे ्नधक्का प्रमाणे भूमिका करीत आहेत. सरपंचाची विकासात्मक कामात बघ्याची भूमिका पाहून ते लवकरच पायउतार होण्याचे चिन्ह दिसत आहेत. याबाबत विरोधी सदस्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे बोलले जात आहे. पालोरा हे परिसरातून मध्यभागी असून जवळपास दोन हजार लोकवस्तीचे आहे. नवसदस्यांनी भरलेली ही ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे सुरु आहे. ग्राम पंचायत सदस्यात रस्सीखेच सुरु आहे. येथील सरपंच गावातील खर्चाचे बिल स्वमर्जीने काढणे, ग्राम पंचायत कार्यालयामध्ये पतिदेवाची उपस्थिती ठेवणे, ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा वापरणे, गावात विकासात्मक कामाकडे दुर्लक्ष करणे, मी म्हणेन तो कायदा अमलात आणणे आदी कारणामुळे ग्रा.पं. पदाधिकारी त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांना पाणी पुरवठा करणारी लाखो रुपयाची नळ योजना नियोजनाअभावी धूळ खात पडली आहे, याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. नाव मोठे दर्शन खोटे अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. गावातील स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी नाकाला रुमाल बांधावे लागते. स्वत:च्या दोन्ही कडेला घाणच नघाण पाहायला मिळत आहे. ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे हा गाव विकासापासून कोसो दूर आहे. संबंधित लोकप्रतिनिधींने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
मतभेदामुळे रखडला गावाचा विकास
By admin | Updated: October 8, 2014 23:22 IST