लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बसच्या वेळेत बदल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष सचिन घोनमोडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. या मागणीला रास्त धरून बसच्या वेळेत बदल करण्याचे आश्वासन संबंधित साकोली आगार प्रमुखातर्फे देण्यात आले.
दि. २६ जून नंतर सर्वत्र शाळा महाविद्यालये सुरू झालेली आहेत. शाळेत अभ्यासक्रम शिकवायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. परंतु काही बसेसच्या वेळा या विद्यार्थ्यांच्या हिताच्या नसल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बसच्या वेळेत बदल करणे आवश्यक आहे. साकोली ते खोडशिवणी या बसची वेळ दुपारी ४ आणि नंतर रात्री ८ वाजताची आहे.
बहुसंख्य विद्यार्थी शाळेचा अभ्यासक्रम सोडून बस गाठतात. रात्री ८ ची बस विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीची ठरते. साकोली खोडशिवनी या बसची वेळ सव्वापाच वाजताची ठेवल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अथवा सव्वापाच किंवा साडेपाच वाजताची दुसरी बस फेरी ठेवावी. बस संपूर्ण विद्यार्थ्यांनी भरलेली असते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस असेल तर मग सव्वापाचची बस फेरी ठेवून आगारप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून विद्यार्थ्यांचे हित बघावे.
खोडशिवनी ते साकोलीच्या दरम्यान गिरोला, सातलवाडा, किन्ही, विर्सी, खोडशिवनी ही गावे येतात. या गावातील शेकडो विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शाळा महाविद्यालयात विद्यार्जन करण्यासाठी येतात. मात्र साकोलीवरून गावाला जाण्यासाठी त्यांना दुपारी ४ ची बस पकडावी लागते. शाळा महाविद्यालयाला सुट्टी होण्याची वेळ ५ वाजताची आहे.
शिष्टमंडळात यांचा होता समावेशनिवेदन देतेवेळी शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष सचिन घोनमोडे, कार्यकर्ते नरेंद्र वाडीभस्मे, राधेश्याम मुंगमोडे, उमेद गोडसे, धम्मा वैद्य, सचिन करंजेकर, पुष्पक करंजेकर, विनायक देशमुख, विशाल कोसरे, देवनाथ वाघाडे, अशोक राऊत, किशोर बावणे, योगेश कुंबरे, सुरेश गजापुरे, सौरभ वैद्य, दीपक उनवणे, विकास शहारे, सचिन पंचभाई, प्रकाश चुने, दुर्योधन गेडाम, बागडे बाबा आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता. शिष्टमंडळाला आगार प्रमुखांनी आश्वासन दिले.