पालोरा/चौ. : पवनी तालुक्यातील रेतीघाटातून अवैध रेतीचोरीचे प्रमाण वाढले आहे. महसूल विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यास सरसावले असता रेतीमाफियांकडून जीवे मारण्याची धमकी दिली जाते. मागिल महिन्यात पालोरा बसस्थानकावर एका तलाठ्याला रेतीमाफीयाकडून भरदिवसा खुलेआम मारहाण करण्यात आली होती. सोमवारला पवनी येथे तलाठ्याच्या घरी रेतीमाफियांनी हल्ला केला. अजून किती कर्मचारी रेतीमाफियांचे शिकार होणार एखाद्या तलाठ्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल काय, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.प्रशासनाच्या मालमत्तेची रक्षण कणे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. कर्मचारी आपला जीव मुठीत ठेवून आपले कर्तव्य करीत आहेत. मात्र त्यांचे रक्षण करण्याकरीता प्रशासनाकडून कोणतेही पाऊल उचले गेले नाही. तालुक्यात आठ रेतीघाटांचा समावेश येतो. यात पवनी, येनोळा, जुनोना, कुर्झा, वलनी, ईटगाव, शिवनाळा व गुडेगावांचा समावेश येतो. यावर्षी येथील पाच रेतीघाटांचा लिलाव प्रशासनाकडून करण्यात आले. यात ईटगाव, येनोळा, जुनोना, वलनी व गुडेगावाचा समावेश येतो. वैनगंगा नदीची रेती दर्जेदार असल्यामुळे विदर्भात रेतीची मागणी आहे. इटगाव रेतीघाटाचा लिलाव झाला असला तरी मात्र मध्यरात्रीपासून रेतीचोरी सुरू होते. कुर्झा रेतीघाटावरून रात्र-दिवस अवैध रेतीचा उपसा करण्यात येतो. महसूल विभागाचे कर्मचारी कार्यवाही करण्यास गेले असता त्यांना मारहाण करण्यात येते. अजून किती कर्मचाऱ्यांना रेतीमाफीयाकडून मार खावा लागेल, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. (वार्ताहर)
रेतीमाफियांची दबंगशाही
By admin | Updated: February 13, 2015 01:02 IST