अडीच मीटर रेती वाहून गेली : पुलावर खड्डे, बसतात हादरेमोहन भोयर तुमसरतुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील वैनगंगा नदीवर राज्य शासनाने ४८ वर्षापूर्वी पूल बांधला होता. पूलाच्या एकूण नऊ स्पॅनजवळील अडीच मीटर रेती वाहून गेली. नदी पात्रात केवळ दीड मीटर रेती शिल्लक आहे. स्पॅन उघडे पडले आहे. या पूलावर खड्डे पडले आहे. जड वाहने येथून मार्गक्रमण करतानी पूलाला हादरे बसतात. महाडच्या दुर्घटनेनंतर येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भिती जाणवत आहे.तुमसर-गोंदिया-साकोली राज्य महामार्गावर माडगी येथे वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र आहे. राज्य शासनाने येथे ४८ वर्षापूर्वी रहदारीकरिता मोठा सिमेंटचा आरसीसी पूल तयार केला. ७ जून १९६८ रोजी हा पूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या पुलाचे उद्घाटन केले होते. पुलाचे नऊ स्पॅन आहेत. या स्पॅनजवळील सुमारे अडीच मीटर रेती वाहून गेली. हे स्पॅन सध्या खुले झाले आहेत. तांत्रिकदृष्ट्या यामुळे पूलाला धोक्याची शक्यता आहे. बेसुमार रेती उपश्यामुळे नदीपात्रात रेती नाही. तामसवाडी सि., तथा रोहा बेटाळा येथे नदीपात्रात रेती उपश्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात पूरासोबतच मोठ्या प्रमाणात रेती वाहून येते. परंतु जिथे खड्डे पडले आहेत तिथे रेती गुरूत्वाकर्षनामुळे ओढली जाते. माडगी पूलाजवळ यामुळेच रेती जमा होत नाही.या पुलाला समांतर रेल्वे वाहतुकीकरीता दोन पूल आहेत. एक ब्रिटीशकालीन असून दुसरा भारतीयांनी तयार केला आहे. ब्रिटीशकालीन पूलाला १०५ वर्षे झाली आहेत. दोन्ही पुलाच्या स्कॅनजवळ रेती नाही. ब्रिटीशकालीन पूल दगडी आहे.तुमसर-गोंदिया राज्य मार्गावरील पूलाचे स्पॅनमध्ये ३८.२० मिटरचे अंतर आहे. एक स्पॅन ३८.५० मीटर अंतरावर आहे. पूलाच्या बांधकामावर २६ लक्ष ३७ हजार इतका खर्च करण्यात आला. पूलाची लांबी ३८२.६० मीटर इतकी आहे.पूलाची स्थिती भक्कम आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे पूलाला कोणताच धोका नाही. पूल जितका वर आहे तितकाच तो खाली आहे. या पूलाची तपासणी नेहमी करण्यात येते. सुमारे ८० वर्षे या पूलाचे आयुष्य आहे. -विजया सावरकर, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
पूल ठरला धोकादायक
By admin | Updated: August 7, 2016 00:16 IST