भंडारा : यंदाच्या दिवाळीचा व्यवसाय नोकरदार वर्गावरच अवलंबून होता. शेतकऱ्यांची दिवाळी मात्र धानपिकाने ऐनवेळी दगा दिल्यामुळे जेमतेमच साजरी झाली. उत्साहाच्या भरात जिल्ह्यात दिवाळीच्या तीन दिवसांत तब्बल पाच कोटी रुपयांच्यावर उलाढाल झाल्याचा अंदाज भंडारा येथील व्यावसायिकांनी वर्तविला आहे. सराफा व्यवसायात मागील वर्षीच्या तुलनेत उलाढाल कमी झाली असली तरी भाव फरकाने ही उलाढाल कोटींच्या घरात आहे. लक्ष्मीपूजनानंतर केवळ चार तासांत ९० लाखांच्या घरात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. लक्ष्मीपूजनात प्रवेशद्वाराला सुशोभित करणाऱ्या झेंडूच्या फुलांची विक्री ९ लाखांच्या घरात आहे.जिल्ह्यात सराफ्याची शेकडो दुकाने आहेत. धनत्रयोदशीला सोने खरेदीचा उत्साह जाणवला नसला तरी नोकरदार वर्गाची सोने खरेदी व लक्ष्मी पुजनाला आवश्यक महालक्ष्मीचे चांदीचे शिक्के मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले. पूजेसाठी लागणाऱ्या आवश्यक फळात केळीची दोन लाखांची विक्री झाली. संत्रा आणि सीताफळालाही उच्चतम मागणी होती. परंतु यावर्षी सीताफळे पाहिजे त्या प्रमाणात विक्रीला आलेली नाहीत. तोरणासाठी आंब्याच्या पानाची विक्री २५ हजार रुपयांपर्यंत झाली. दिवाळीच्या सणाला झेंडू फुलाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या तीन दिवसांत दीड लाखांवर झेंडू फुलांची विक्री झाली. मोकळ्या जागेत फटाके फोडल्याने आवाजाचा फारसा परिणाम नाही. मात्र गल्लीबोळात १२५ डेसीबल आवाज मर्यादेचे फटाके फोडल्यानंतरही ध्वनिप्रदूषणाचा धोका होण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली. दिवाळीनिमित्त बाजारात विक्रीसाठी आणलेल्या फटाक्याच्या लडीची मर्यादा १०५ डेसिबलची असताना त्यानेही कमाल मर्यादा पार केल्याचे जाणवले.जिल्ह्यात यावर्षी फटाक्यांच्या ५० च्यावर दुकानांना परवानगी देण्यात आली. त्यातून सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचा व्यवसाय झाल्याची शक्यता फटाका व्यावसायिक अरविंद मोटघरे यांनी सांगितले. मात्र यंदा शेतकऱ्यांची दिवाळी जेमतेम असल्यामुळे या व्यवसायाचा दारोमदार नोकरदार वर्गावरच अवलंबून होता. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण वाढलेध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन न्यायालयाने १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या निर्मितीवर बंदी घातली आहे. तरीही प्रत्यक्षात मात्र १३० डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे फटाके फोडले जात आहेत. ध्वनिप्रदूषणामुळे व मोठ्या आवाजामुळे कानावरही आघात होऊ लागले आहेत. फटाक्याच्या पाकिटांवर आवाजाच्या क्षमतेचा उल्लेख केला असला तरी प्रत्यक्षात फटाक्यांनी स्फोटांची कमाल मर्यादा पार केल्याचे या आवाजावरून दिसून येते. (नगर प्रतिनिधी)
दिवाळीच्या तीन दिवसात कोट्यवधीची उलाढाल
By admin | Updated: October 27, 2014 22:30 IST