कृषी विभागाचा नजरअंदाज अहवालभंडारा, साकोली, लाखांदूर तालुक्यात सर्वाधिक नुकसानभंडारा : रविवारी मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ७ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसला आहे. यात भंडारा, साकोली व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने गहू, हरभरा व लाखोळी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा कृषीविभागाने शासनाकडे या संबंधात नजरअंदाज अहवाल बनविला आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी आटोपत असतानाच शेतातील पिके कापणीयोग्य झाली होती. जिल्ह्यात गहू पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली आहे. सध्या गव्हाची ओंबी आल्याने ती कापणीयोग्य झाली असतानाच रविवारी मुसळधार पावसाचे आगमन झाले. गहू, हरभरा व लाखोळीचे रब्बी हंगामात मोठ्या हंगामात उत्पादन घेतल्या जाते. यासोबतच काही ठिकाणी बागायती शेती करण्यात येते. मात्र अवकाळी पावसामुळे या पिकांना मोठ्या पिकांना फटका बसला आहे. रविवारी मध्यरात्री भंडारा, साकोली व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे येथील शेतीत कापणीयोग्य असलेल्या गहू पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यादृष्टीने जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर असलेल्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्राथमिक नजरअंदाज अहवाल मागितला आहे. या अहवालात ७ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. यात ५० टक्केच्या आत ६ हजार १७९ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले असून ५० टक्केच्या वरील १ हजार ३६० हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसानीचा फटका साकोली तालुक्याला बसला असून त्या खालोखाल भंडारा व लाखांदूर तालुक्यात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देता यावी यासाठी कृषी विभागाने अधिनस्थ कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत. अवकाळी पावसात बहरलेला आंब्याचा मोहोर गळून पडला आहे. यासोबतच काही भागात बागायती शेतीत संत्राचेही उत्पादन घेण्यात येते. तुमसर तालुक्यात संत्रा शेतीलाही याचा फटका बसला आहे. भाजीपाला पिकाचीही पावसामुळे नासाडी झाली आहे. (शहर प्रतिनिधी)अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. बळीराजाला नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांच्या संयुक्त मदतीने सर्व्हेक्षण करण्यात येईल. आठवडाभरात याचा अहवाल प्राप्त होईल. शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत राहील. - एस.एस. किरवे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा.तालुकानिहाय नुकसान भंडारा तालुक्यात १ हजार ३२७ हेक्टर क्षेत्रातील पिकांना नुकसानीचा फटका बसला आहे. यासोबतच मोहाडी ५०० हेक्टर, तुमसर ६०० हेक्टर, साकोली ३८५२ हेक्टर, लाखांदूर १२६० हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून पवनी व लाखनी तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
७ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका
By admin | Updated: March 4, 2015 01:03 IST