लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : शासन परवानगी तसेच मान्यतापत्राशिवाय अनधिकृतपणे सुरू असणाऱ्या शाळांविरुद्ध बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १८ नुसार लाखांदूर शहरातील दोन संस्थांच्या शाळा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास लाखांदूर पोलिसांनी दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे पद्मशील रामचंद्र ढाले (औरंगाबाद) यांच्यासह द्विंकल स्टार स्कूलचे संचालक नागेश शामराव रामटेके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
लाखांदूर तालुक्यात शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल व द्विंकल स्टार स्कूल या दोन शाळा अनधिकृतपणे चालविले जात असल्याचे आढळून आले. यापूर्वीच्या शैक्षणिक क्षेत्रांमध्ये देखील या शाळा अनधिकृतपणे चालवत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले होते. वारंवार पत्रव्यवहार करून देखील संबंधित संचालकांनी या अनधिकृत शाळा बंद केल्या नाही. अंबादे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही शाळा व्यवस्थापकांवर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार सचिन पवार करीत आहे.
सुरु होते अनधिकृत वर्ग
- २९ नोव्हेंबरला लाखांदूर येथील दि' बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लाखांदूर व द्विकल स्टार स्कूल येथे पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी भेट दिली.
- दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल येथे १ ते ६ चे अनधिकृतपणे वर्ग भरत असून, त्यामध्ये ६९ विद्यार्थी शिकत असलेले आढळले.
- तर द्विकल स्टार स्कूलमध्ये १ ते ४ चे अनधिकृतपणे वर्ग भरत असून, त्यामध्ये ३१ विद्यार्थी अनधिकृतपणे शिक्षण घेत असल्याचे आढळून आले. याची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या पत्रानुसार लाखांदूर पोलिसांत तक्रार दाखल केली.
- शाळा चालविताना शिक्षण विभागाची मान्यता घेणे आवश्यक असले तरी प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून हा प्रकार सुरू आहे. यामुळे पालकांची फसगत होत असल्याचे प्रकार आहेत. दहावीपर्यंत कसेबसे वर्ग चालवून बोर्ड परीक्षेसाठी केंद्र मिळविताना मात्र संबंधितांची अडचण होत असते.