पालोरा (चौ.) : वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन पवनी तालुक्यातील वलनी पशुवैद्यकीय श्रेणी २ दवाखान्यांतर्गत भेंडाळा येथील नामदेव पारधी यांची गाय प्रसूतीदरम्यान येथील बोगस डॉक्टर पराग वैद्य यांच्या उपचाराने गाईचा मृत्यू झाला. यात त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या बोगस डॉक्टरांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील पशुपालकांनी केली आहे.दुधाला वाढ व्हावी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. जनावरांवर तात्काळ उपचार व्हावे म्हणून अनेक गावात जिल्हा परिषद अंतर्गत अनेक ठिकाणी शासकीय दवाखाने उभारे आहेत. मात्र डॉक्टर दवाखान्यात उपस्थित न राहता खासगी उपचाराकरिता फिरत असल्याने आपले खिसे गरम करीत आहेत.मात्र डॉक्टर दवाखान्यात वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे परिणामत बोगस डॉक्टरकडून उपचार करून घ्यावे लागत आहे. यामुळे अशा बोगस डॉक्टराकडून अनेक जनावराचे मृत्यू झाले ओत. भेंडाळा येथील पराग वैद्य याने पशुसंदर्भात व्हेटरनरी परीक्षा पास केली आहे. यामुळे यांना प्रशासनाकडून पशुसेवक म्हणून कार्यरत केले आहे. यात त्यांना जनावरांवर उपचार न करणे, इंजेक्शनचा वापर न करणे, दवाईया लिहून व लिहून देणे आदी शासनाने बंदी घातली आहे.यांना फक्त गाईंना कृत्रीम रेतन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र बोगस डॉक्टर उपचार करून पैसे कमावित आहेत. एका बोगस डॉक्टराने गाईचे प्रसूती करून देतो म्हणून गाईच्या पोटात हात टाकून वासराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.या दरम्यान वासराचा गाईच्या पोटातच मृत्यू झाला. जवळपास तीन तास ही प्रक्रिया सुरु होती. गाईला रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे गाईची गंभीर प्रकृती झाली होती. नामदेव पारधी यांनी कोंढा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सोनकुसरे यांना फोन करून बोलाविले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करीत असताना उपचारापूर्वीच गाईचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. (वार्ताहर)
बोगस डॉक्टराच्या उपचाराने गाईचा मृत्यू
By admin | Updated: September 17, 2014 23:36 IST