लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होऊन आता अडीच महिने झाले असून, या कालावधीत एक लाख २२ हजार ८९७ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली. त्यातील १० हजार ४१२ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. जिल्ह्यात १६८ केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू असून, मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध आहेत. भंडारा जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला हेल्थकेअर वर्कर यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाइन कोरोना व्हॉरिअर्स यांना लस देण्यात आली. १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात २६५ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली होती. आतापर्यंत एक लाख २२ हजार ८९७ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यात एक लाख १२ हजार ४८५ व्यक्तींना पहिला डोस तर दहा हजार ४१२ व्यक्तींना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी दिल्या जात आहेत. कोविशिल्ड लस ५७ हजार ११३ व्यक्तींना तर कोव्हॅक्सिन लस ६५ हजार ७८४ व्यक्तींना देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनामुक्त मोहिमेसाठी लसीकरण हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील १६८ केंद्रांवर कोरोनाची लस दिली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र आणि काही खासगी रुग्णालयांतही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांची बेफिकीर वृत्ती त्याला कारणीभूत आहे. प्रशासनाच्यावतीने विविध निर्बंध लावल्यानंतरही नागरिक नियमांना पायदळी तुडवत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरणासाठी नागरिकांनी यावे यासाठी मोहीम सुरू केली आहे. गावागावांत जनजागृती करून ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. ग्रामीण व शहरी भागात या लसीकरणाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे.
४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरुवातीला ६० वर्षांवरील सर्व व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस दिली जात होती. मात्र १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. १ एप्रिल रोजी जिल्ह्यात १० हजार ६४५ व्यक्तींना लस देण्यात आली. त्यात १० हजार ३२१ व्यक्ती प्रथम डोस घेणाऱ्या आहेत. जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.