विरली (बु.) : होळी म्हणजे विविध रंगाची उधळण करीत बेधुंद होऊन नाचण्याची पर्वणी. या सणाला संपूर्ण देशात सर्व आबालवृद्ध देहभान विसरून विविध रंगांनी न्हाऊन निघतात. मात्र लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथील गावकऱ्यांनी गेल्या २२ वर्षापासून होळीला रंग न खेळण्याची परंपरा जोपासली आहे.या गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते गनराळा येथील हनुमान मंदिरात राहत असत. ते व्यवसायाने गवंडी होते. त्यांनी श्रमदानातून या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यांचा मितभाषी, मनमिळावू स्वभाव आणि धार्मिक वृत्तीमुळे ते परिसरात सुप्रसिद्ध होते. अशा या श्रमप्रतिष्ठेला चालना देणाऱ्या कर्मयोगी किसनबाबांचे सन १९९३ ला होळीच्या दिवशी देहावासान झाले. संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. त्यावेळी शोकमग्न गवराळावासीयांनी होळी साजरी न करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प अद्याप अबाधित आहे. होळीच्या दिवशी सर्वत्र विविध रंगाची उधळण करीत मद्यपान करून आचकट विचकट नारेबाजी करून मौजमजा केली जाते. मात्र गवराळा येथे कर्मयोगी किसनबाबा अवसरे महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्रिदिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते. धुलीवंदनाच्या दिवशी अवसरे महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून गोपालकाला व महाप्रसादाने या महोत्सवाचा समारोप होतो. या कार्यक्रमात गावातील सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात. अशाप्रकारे येथील ग्रामवासी रासायनिक अथवा नैसर्गिक रंगाऐवजी भक्तीरसात न्हाऊन निघतात.पुण्यतिथी महोत्सवातविविध मान्यवरांचे धार्मिक जनजागृतीपर कार्यक्रम, सामूदायीक ध्यान, सामूदायीक प्रार्थना, कीर्तन, भारुड, भजन, दिंडी आदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामसफाई करून जमा झालेल्या कचऱ्याची प्रतिकात्मक होळी पेटविली जाते.यावर्षी ४ ते ६ मार्चपर्यंत आयोजित पुण्यतिथी महोत्सवात गुरुकुंज मोझरी येथील लक्ष्मणदादा नारखेडे यांची दररोज ग्रामगीतेवर प्रवच ने होणार आहेत. या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुण्यतिथी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी येथील हनुमान देवस्थान पंचकमेटीचे अध्यक्ष तुळशीराम ठाकरे, सचिव लोचन पारधी, कोषाध्यक्ष गजानन शहारे आणि पंचकमेटीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)
गवराळावासीयांची रंगाला तिलांजली
By admin | Updated: March 6, 2015 01:01 IST