मोहाडी येथील घटना : सात महिन्यांपासून सुरु होता शोध
मोहाडी : विजयादशमीच्या दिवशी येथील कार्तिक वसंत सोरते (९) व मोहित वसंत सोरते (७) ही दोन भावंडे ेबेपत्ता झाली होतीे. घटनेच्या तिसर्या दिवशी १५ आॅॅक्टोबरला गावाजवळील एका नाल्यात कार्तिकचा मृतदेह आढळून आला होता. दुसरा भाऊ मोहित तेव्हापासून बेपत्ता होता. पोलिसांची शोधमोहीम सुरूच होती. दरम्यान गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास रोहणा येथील स्मशान घाटाजवळील कोरड्या नाल्यात त्याचा सांगाडा आढळून आला. रोहणा येथील या नाल्यामधील पाणी आटलेले आहे. त्याठिकाणी रेतीत कपडे दबलेले असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी ते कपडे उकरुन काढले असता त्या कपड्यातून हाडे आढळली. पोलिसांना शंका आल्यामुळे त्यांनी माती पुन्हा उकरली असता असता निळा पँट व पांढरा शर्ट एकाच ठिकाणी आढळून आले. या नाल्यात दगड असल्यामुळे आणि मोठमोठे गवत उगवलेले असल्यामुळे त्या मुलांचा मृतदेह अडकला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. या कपड्यावरुन मोहितच्या वडिलांना ओळख पटली. पँन्टच्या खिशात दोन रुपयाचा शिक्कासुद्धा जशाचा तसाच होता. हाडांचा सांगाडा डीएनए चाचणीसाठी नागपूरला पाठविण्यात आला आहे. त्या मुलाचा सांगाडा मिळाल्याने आता अफवांना पूर्णविराम मिळालेला आहे. मात्र आरोपी अद्याप मोकाट आहे. तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक उल्हास चौधरी, हवालदार गिरीपुंजे, बाभरे, रोडगे हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)