मोहाडी : काही दिवसांपासून कोंबड्यांना अज्ञात आजाराची लागण झाल्याने शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. आजाराची साथ पसरलेली असल्याने नागरिकही भयभीत झाले आहेत. प्रशासनाने त्वरीत उपाययोजना करून प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मोहाडी येथील नागरिकांनी केली आहे.मोहाडीतील अनेक घरात गावठी कोंबड्यांचे पालन करण्यात येते. बाजारात गावठी कोंबड्यांना चांगला भाव मिळतो. तसेच अंडींना सुद्धा चांगला भाव आहे. ज्यामुळे अनेक परिवारांना या कोंबड्यांमुळे चांगला आर्थिक नफा प्राप्त होतो. एका कोंबडी व्यवसायाची मते गावठी कोंबडी ३०० रुपये प्रति किलोच्या भावाने विकली जाते तर अन्य जातीची कोंबडी १५० रुपये प्रति किलो प्रमाणे मिळते. गावठी कोंबडीचे अंडे १२ ते १५ रुपये प्रति नगाप्रमाणे विकले जातात तर विलायती कोंबडीचे अंडे जे बाजारात उपलब्ध असतात ते ५ ते ७ रुपये प्रति नगाप्रमाणे मिळतात. ज्यामुळे गावठी कोंबड्या पोसणे फायदेशीर असते. मात्र काही दिवसापासून गावात या कोंबड्यावर अज्ञात रोगानेथैमान घातले आहे. एका एका घरातील दहा ते पंधरा कोंबड्या एकाच वेळी मरत आहेत. त्या मेलेल्या कोंबड्या मग उघड्यावरच फेकल्या जातात. ज्यामुळे रोगराई पसरण्याची भिती आहे. आतापर्यंत शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत.या कोंबड्या प्रथम कमजोर होतात त्यांना चालताही येत नाही. नंतर त्या कोंबड्या तोंडातून विचित्र असा घरघर आवाज काढतात व काही वेळानंतर तडफड तडफड करून प्राण सोडतात. या प्रकारचा रोग या कोंबड्यांना होत आहे. कोंबड्यांना रोग लागल्यावर ते दोन ते तीन दिवसात मरतात. (शहर प्रतिनिधी)
कोंबड्यांना अज्ञात आजाराची लागण
By admin | Updated: March 8, 2015 00:27 IST