लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : न्यू दिल्ली स्थित फ्रेंडशिप फोरम तर्फे आदिवासी क्षेत्रातील विशेष कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार एस.एन. मोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चेतनकुमार मसराम यांना दिल्ली येथे फ्रेंडशिप फोरमतर्फे आयोजित इकॉनॉमिक ग्रोथ एन्ड नॅशनल युनिटी या विषयावरील परिषदेत प्रदान करण्यात आला. डॉ.चेतनकुमार मसराम हे सन २०१० पासून तुमसर येथील एस.एन. मोर कला, वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत आहेत. ते उच्च विद्याविभूषित आहेत. २०१० पासून डॉ.मसराम यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी समाजकार्य केले आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजातील युवकांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन, आदिवासी युवती व महिलांचे सबलीकरण, व्यक्तीमत्व विकास, आदिवासी युवकांसाठी रोजगारांच्या संधी या विषयावर मार्गदर्शन तसेच आदिवासी समाजात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विकासात हातभार लावला आहे. डॉ.चेतन मसराम यांच्या उपरोक्त कार्याची दखल घेऊन फ्रेंडशिप फोरम, दिल्ली यांनी डॉ.मसराम यांना भारत एक्सलेंस अवार्डने सन्मानित केले आहे.
चेतनकुमार मसराम भारत एक्सलेन्स अवॉर्डचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 00:25 IST