लाखनी : लाखनी नगरपंचायत हद्दीतील आदर्श नगर प्रभाग क्रमांक ४ ही नवीन वसाहत आहे. या प्रभागातील रहिवाशांना कच्च्या रस्त्यामुळे ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. या भागातील रहिवाशांची मागणी लक्षात घेता, नगराध्यक्षा ज्योती निखाडे आणि नगरसेविका साधना वंजारी यांच्या प्रयत्नांनी तत्कालीन आमदार राजेश काशिवार यांनी विशेष बाब म्हणून सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामास शासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली. ई-निविदा पद्धतीने आदर्श नगर प्रभाग क्रमांक ४ मधील सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे कंत्राट सरफराज ए. कोटील (गोंदिया) यांना देण्यात आले. यावर देखरेख व संनियंत्रणाचे काम नगरपंचायतीचे कनिष्ठ अभियंता गजानन कराळ व तत्कालीन मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्याकडे होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना ६) ला लागून कृषी उत्पन्न बाजार समिती ते विजयकुमार दुबे यांच्या घरासमोर ४० फूट आणि इतर सिमेंट काँक्रीटचे उपरस्ते वर्षभरापूर्वी तयार करण्यात आल्याचे या परिसरात वास्तव्यास आलेल्यांचे म्हणणे आहे.
कंत्राटदार आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या संगनमताने साहित्याचा अत्यल्प वापर करून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. परिणामी, वर्षभरातच या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याचे दिसून येते. या रस्त्यावरून दुचाकी किंवा चारचाकी गेल्यास धूळ उडून गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याचा निचरा योग्यरीतीने होत नसल्यामुळे रस्त्यालगत पाणी साचले आहे. पटले ते नवखरे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्यावर मुरूम टाकला असल्याने त्यावरून दुचाकी स्लीप होऊन पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार कंत्राटदाराच्या हलगर्जीपणा व नगरपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे झाला आहे. या रस्त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आनंद दामले, अलका नंदेश्वर, जयदेव गभणे, गुलशन चोपकर, अशोक नवखरे, सुनील नंदेश्वर, धानसिंग बिसेन, प्रमिला टेकाम, भारत पंधरे, लवकुश निर्वाण, कैलाश गिऱ्हेपुंजे, ज्योत्स्ना सांगोळे, जी. बी. पटले, अलका तरोणे, शिल्पा ढोणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.