प्रवाशाला अटक : भंडारा - तिरोडा बसमधील प्रकारतुमसर : अर्ध्या तिकीटावरून महिला बसवाहकांशी शाब्दीक चकमक होऊन धक्काबुक्की करून एका प्रवाशाने शिवीगाळ केली. याप्रकरणी संबंधित प्रवाशांविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी चौबे नामक प्रवाशाला अटक करून गुन्हा दाखल केला. ही घटना संध्याकाळी ६ वाजता विनोबा भावे बायपास मार्गावर घडली. या प्रकारामुळे सदर महिला वाहक भयभीत झाली. भंडारा - तिरोडा बस क्रमांक एम.एच. ०६-७६२३ मध्ये कर्तव्यावरील महिला बसवाहक उमा उद्धव घाडगे (४५) रा.विद्यानगर, भंडारा यांच्याशी अर्ध्या तिकीटावरून प्रवाशी सुरेश प्रेमलाल चौबे (६३) रा.बाजार वॉर्ड, लाखनी यांची प्रथम शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर सुरेश चौबे याने महिला वाहक घाडगे यांना धावत्या बसमध्येच धक्काबुक्की करून शिविगाळ केली. महिला बसवाहक उमा घाडगे यांनी घडलेल्या प्रकाराची तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर तुमसर पोलिसांनी सुरेश चौबे याच्यावर भादंवि ३५३, ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार राजेंद्र गोंडाणे हे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
वाहक महिलेला धक्काबुक्की
By admin | Updated: October 7, 2016 00:45 IST