राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांवर चालला बुलडोजर; साहित्य घेतले ताब्यात
By युवराज गोमास | Published: February 13, 2024 02:39 PM2024-02-13T14:39:28+5:302024-02-13T14:39:41+5:30
नगरपालिका, वाहतूक विभागाची कारवाई
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी व अपघात रोखण्याचा उपाय म्हणून १३ फेब्रुवारी रोजी दुपारपासून भंडारा शहरातील ऑफीस क्लब ते नागपूर नाकापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ करण्यात आला. अतिक्रमणांवर बुलडोजर चालविण्यात आला. तसेच अतिक्रमणे न काढणाऱ्यांचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई भंडारा नगरपालिका, महामार्ग वाहतूक पोलिस व जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आली.
सहा महिन्यापूर्वी भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेले अतिक्रमणे तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. परंतु, दुसऱ्यादिवशी पुन्हा अतिक्रमणे 'जैसे थे' झाले होते. परिणामी वाहतुकीला अडथळा येवून सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत होती. अनेकांना वाहतुकदारांना अपघातांना सामोरे जावे लागत होते. महामार्गाच्या अगदी कडेला चहा टपरी, हॉटेल, ट्रॅव्हर्ल्स चालकांसह फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली. त्यामुळे वाहतुकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत अनेक शासकीय कार्यालये आहेत. यात आरटीओ कार्यालय, पेट्रोलपंप, व्यावसायिक दुकाने, जिल्हा परिषद, वनविभाग, पंचायत समिती, तहसील व एसडीओ कार्यालय, पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, विविध हॉटेल, बार, अन्य शासकीय कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाणे यांचा समावेश आहे. खासगी व व्यावसायिक कार्यालयात जिल्ह्यातून विविध कामानिमित्त येणाऱ्यांची मोठी संख्या असते. दुचाकी व चारचाकी वाहनांनी नागरिक येत असल्याने भर महामार्गावरच वाहने उभी ठेवली जात आहेत. अनेक फुटपाथ व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने शासकीय कार्यालयांत प्रवेश करण्यास कठीनाईचा सामना करावा लागतो आहे.
यावर उपाय म्हणून भंडारा नरपालिका, जिल्हा वाहतूक शाखा व महामार्ग पोलिसांनी अतिक्रमण हटविण्याची माहिम हाती घेतली.
प्रशासनाकडून यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, अखेरपर्यंत अनेकांनी अतिक्रमणे जैसे थे ठेवल्याने मंगळवारला अतिक्रमण हटाव दस्त्याने बलडोजर लावून अतिक्रमणे पाडली. तर अतिक्रमण हटाव दस्त्याने अनेकांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली. दुपारी ही कारवाई राष्ट्रीय महामार्गावरील ऑफीसर क्लबपासून सुरू करण्यात आली. नागपूर नाकापर्यंत ही कार्यवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी, जिल्हा वाहतूक शाखा व महामार्ग पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
फुटपाथ व्यावसायिकांना जागा द्या
अतिक्रमण हटाव मोहिमेत फुटपाथ व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. शहरात फुटपाथ व्यावसायिकांना जागा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित फुटपाथ व्यावसायिकांनी केली आहे. नगरपालिका प्रशासन याकडे अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही करण्यात आला.