मुखरू बागडे लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव खेड्यातील १५५ कुशल कामे थांबल्याने विकासाला ब्रेक लागला आहे. शेवटच्या टोकातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत विविध बांधकामांचे नियोजन करून विकासाची गती मिळवण्याकरिता संधी मिळते. निधीच्या कमतरतेमुळे शासनाच्या या निर्णयाने पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायत स्तरावर नियोजित कामे होणार नसल्याने गावखेडी विकासापासून लांब जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
ज्या कामांतर्गत सर्वात जास्त कामे उपलब्ध करुन दिली जात होती त्याच कामांना ब्रेक मिळाल्याने मजुरांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. कामे जेव्हा सुरु होतील तेव्हा होतील. पण तोपर्यंत काय होणार हे मात्र अनिश्चित आहे.
ग्रामपंचायतींना निधी पडतो अपुरातालुक्यातील बऱ्याच गावातील ग्रामपंचायतीअंतर्गत फुटलेल्या नाल्या दुरुस्त करण्याची हिंमत ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून होत नाही. नवीन ठिकाणी नाली तयार करू शकत नाही. गावकऱ्यांना योग्य वेळेत न्याय देण्यासाठी ग्रामपंचायत अपुरी पडत आहे. पंचायतराज अंतर्गत शासनाने थेट ग्रामपंचायतीला निधी पुरवून विकासाचा ध्यास पूर्ण करण्याचा केलेला निर्धार धुळीस मिळत असल्याची टीका सरपंच संघटनेकडून केली जात आहे.
ही कामे झाली बंदपांदण रस्ते, आवारभिंत, मोरी बांधकाम, गटार नाल्या, सिमेंट रस्ते, सौंदर्याकरण, गुरांचे गोठे अशा १५५ प्रकारच्या कामांना प्रतिबंध मिळाल्याने ग्रामपंचायती समस्येत आलेल्या आहेत.
मिळत होती विकासाची दिशालोकप्रतिनिधी (आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य) स्थानिक ग्रामपंचायतींना अपेक्षित निधी देऊ शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल नियोजनातून काही प्रमाणात विकासाची दिशा मिळते. यातसुद्धा प्रतिबंधामुळे गावखेडी विकासापासून लांब जाण्याची शक्यता आहे.
निव्वळ लाखांसाठी थांबली योजनांची कामेपालांदूर ग्रामपंचायत अंतर्गत १३ लाख ३९ हजारांचा निधी सहा महिन्यांपासून थांबला आहे. दोन कामे मंजूर असून निधीअभावी सुरू केलेली नाहीत. ग्रामपंचायत मांगली येथील पाच लाखांचा निधी थकीत असून इतर तीन कामे निधी न मिळाल्याने पेंडींग आहेत.
१४ लाख रुपयांचा निधी एकट्या कामासाठी थांबला आहेरोजगार हमी योजनेअंतर्गत शेकडो मजुरांच्या हाताला काम मिळत असते. यात कुशल व अकुशल दोन्ही कामांचा समावेश असतो. आता कुशल कामे बंद आहेत.
"मग्रारोहयो आयुक्त कार्यालयाकडुन आलेल्या पत्रानुसार ग्रामपंचायत स्तरावरील कुशल कामे तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेली आहेत. प्रतिबंध हटताच कामांना परवानगी दिली जाईल."- संदीप पानतावणे, गटविकास अधिकारी, लाखनी.
"शासनाने ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर वाढीव निधी मग्रारोहयोअंतर्गत पाठपुरावा करून तत्परतेने कुशल कामाची परवानगी द्यावी. जेणेकरून गाव पातळीवर अत्यावश्यक असलेली कामे तत्परतेने करायला मदत होईल."- मंगला वाघाडे, सरपंच मांगली