जखमींवर उपचार सुरु : मोहगाव येथील घटनाचुल्हाड (सिहोरा) : तुमसरहून सिहोराकडे प्रवाशांना घेऊन येणा-या काळी-पिवळी वाहनाने मोहगाव (खदान) गावानजीक झाडाला धडक दिल्याने सात प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. जखमींना तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तुमसर येथून काळी-पिवळी वाहन प्रवाशांना घेऊन सिहोराकडे येत असतांना तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील मोहगाव (खदान) गावानजीक अचानक वाहनाचा चालक आकाश गायकवाड (२५) रा. बपेरा याची प्रकृती बिघडली. भरधाव वेगात काळी-पिवळी वाहन एम.एच. ३६-३३२० असलेल्या चालकाला काही सुचले नाही. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिल्याने वाहन बसलेले सात प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांच्या डोके, हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.जखमी प्रवाशांची आकाश गायकवाड चालक, सायत्रा किरणापुरे उमरवाडा, तुषार गोंडाने तुमसर, रामकिशोर राऊत खैरलांजी, तानेश्वर मंडलकर व सिंधु मंडलकर रा. चुल्हाड अशी नावे आहेत. जखमी प्रवाशांना गावक-यांचे मदतीने तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहेत. विरुध्द दिशेने येणा-या ट्रकला काळी-पिवळी वाहनाने धडक दिली नाही. त्यामुळे सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप बचावले. या प्रवासी वाहनात ११ प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. वाहन चालक आकाश गायकवाड विरोधात सिहोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे करीत आहे. (वार्ताहर)
काळी-पिवळीची धडक; ९ जखमी
By admin | Updated: January 25, 2016 00:41 IST