Bhandara-Gondiya MP today's decision | भंडारा-गोंदियाच्या खासदाराचा आज फैसला
भंडारा-गोंदियाच्या खासदाराचा आज फैसला

ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणार। सकाळी ८ वाजतापासून होणार मतमोजणी । कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याची तब्बल ४२ दिवसांपासून असलेली प्रतीक्षा अखेर गुरुवारी संपणार आहे. थेट लढत झालेल्या भंडारा-गोंदिया मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला विजयाची खात्री असली तरी पराभवाची भीती आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून येथील लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात मतमोजणी होत असून याकडे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना पंचबुध्दे, भाजपचे सुनील मेंढे, बसपाच्या डॉ. विजया नंदूरकर यांच्यासह १४ जणांनी भाग्य अजमाविले. १८ लाख ८ हजार ७३४ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६८.२७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील २१८४ मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे आणि भाजपाचे सुनील मेंढे यांच्यात थेट लढत झाली. कोण विजयी होणार याचा शेवटपर्यंत कुणालाही अंदाज बांधता आला नाही. समर्थक मात्र आपल्या उमेदवाराच्या विजयाची पक्की खात्री देत आहेत.
आज गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रांरभ होणार आहे. अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीची प्रशासनाने जयत तयारी केली असून विजयी जल्लोषासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तयार असल्याचे दिसत आहे. कोण विजयी होणार यासाठी मतमोजणीची प्रतीक्षा सुरू आहे.


Web Title: Bhandara-Gondiya MP today's decision
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.