लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील राखून ठेवलेल्या ५ गटातील ६ जागांच्या मतांची मोजणी गुरुवारी, ३१ जुलैला झाली. यात सहाही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. यामुळे २१ संचालकांच्या या मंडळाता आता महायुतीचे १७ संचालक विजयी झाल्याने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, काँग्रेसला फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
बँकेतील २१ जागांपैकी १५ गटांचे निकाल २८ जुलैला मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आले होते. तर, ५ गटातील ६ जागांचे निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रोखून ठेवण्याचे आदेश दिले होते. २९ जुलैला झालेल्या हिअरिंगनंतर न्यायालयाने हे निकाल जाहीर करण्यास अनुमती दिली होती. मात्र दोनपेक्षा अधिक मतांचा फरक असेल, तरच या जागांचे निकाल जाहीर करता येतील, अशी अट घातली होती. गुरूवारी मतमोजणीनंतर सर्व पाचही गटातील उमेदवारांच्या मतांमधील फरक दोन पेक्षा अधिक होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार, सर्व सहाही जागांचे निकाल जाहीर करण्यात आले.
असे आहेत निकालजंगल कामगार व खरेदी विक्री संस्था या गटातून सहकार पॅनलचे धर्मराज भलावी विजयी झाले. त्यांना १४ तर, परिवर्तन पॅनलचे चंद्रदिन आराम यांना ७ मते मिळाली.
अनुसूचित जाती-जमाती गटातून सहकारचे चेतक डोंगरे यांना ५५८ मते मिळाले तर, परिवर्तनचे धनंजय तिरपुडे यांना ४६७ मते मिळाली.विजाभज/विमाप्र गटातून ५८१ मते मिळवून सहकार पॅनलचे योगेश हेडावू विजयी झाले. त्यापाठोपाठ परिवर्तन पॅनलचे सदाशिव वलथरे यांना ४०७ तर अपक्ष संजय केवट यांना ३९ मते मिळाली.
महिला राखीव गटात सहकार पॅनलच्या आशा गायधने आणि तिरा तुमसरे विजयी झाल्या. त्यांना अनुक्रमे ५०६ आणि ५२३ मते मिळाली. तर, परिवर्तन पॅनलच्या सविता ब्राह्मणकर यांना ४०९, रसिका भूरे यांना ४८३, अपक्ष शिला आगासे यांना ९ मते मिळाली.इतर मागास प्रवर्ग गटातून सहकारचे नाना पंचबुद्धे यांना ५३५, परिवर्तनचे चंद्रकांत निंबार्ते यांना ४५९ तर, अपक्ष असलेले खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे बंधु विवेक पडोळे यांना फक्त ३४ मते मिळाली.