लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अगदी दोन दिवसांवर आली असताना बँकेच्या मतदार यादीमधील एक मतदार बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याचा आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने, निवडणूक होईल; मात्र पुढील आदेशापर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार नाही, असा आदेश शुक्रवारी, २५ जुलैला दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशाने खळबळ उडाली आहे.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक २७ जुलैला होत आहे. २१ संचालक पदासाठी रिंगणात ४६ उमेदवार असून, एकूण १,०६२ मतदारांची नोंद मतदार यादीमध्ये आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, २८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू होऊन मतमोजणीनंतर लगेचच निवडणूक निकाल जाहीर केले जाणार होते.
याचिकाकर्त्याने नाव हरिचंद्र श्रीपत टेकाम असे आहे. त्यांनी जंगल कामगार व खरेदी विक्री संस्था गटातील मतदार कवडो दलसु बांटो या नावावर आक्षेप घेतला आहे. याचिकाकर्त्याच्या मते, हा मतदार नूतन जंगल कामगार सहकारी संस्था सालेहेटी, जि. गोंदीया या संस्थेचा प्रतिनिधी असून मतदार यादीत समाविष्ट आहे. माहितीनुसार, या नावाबद्दल काही महिन्यांपूर्वी सहायक निबंधकांकडे आक्षेप नोंदविला असता त्यांनी या मतदाराला अपात्र केले होते. त्यावर आक्षेप घेतल्यावर हे नाव पुन्हा पात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे हरिचंद्र श्रीपत टेकाम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने शुक्रवारी हा आदेश दिला आहे.
मत सीलबंद लिफाफ्यात !
- न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार, कवडो दलसु बंटो यांना २७ जुलै रोजी होणाऱ्या निवडणूक वेळापत्रकात मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- मात्र, त्याचे मत सीलबंद लिफाफ्यात वेगळे ठेवले जाईल.
- निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार नाही. न्यायालयाच्या पुढील निर्णयानंतर कवडो दलसु बंटो यांची मतपत्रिका विचारात घ्यायची अथवा नाही, हे ठरणार आहे. त्यानंतर मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.