भंडारा : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाचा तपास आणि राज्यात दलितांवर वाढलेले अत्यााचार याकडे शासनाच्या पोलिस विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि घटनांवर आळा बसावा म्हणून दि. १९ नोव्हेंबर रोजी मोर्चा व भंडारा बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात समता सैनिक दलासह २० हजार नागरीक उपस्थित राहतील, अशी माहिती जवखेडे हत्याकांड विरोधी संघर्ष समितीचे अमृत बंसोड यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी समितीचे महेंद्र गडकरी, डी. एफ. कोचे, असित बागडे, सुरेश सतदेवे, एम. आर. राऊत, उपेंद्र कांबळे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, येथील हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततापुर्ण मोर्चा काढण्यात येईल. फेसबुकवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधात विकृत व किळसवाणे फोटो घालून व त्याखाली महापुरुषाची विटंबना करणारा संदेश पाठविल्याने संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रपुरुषाची मानहानी करणाऱ्या राजेश शर्मा यांच्या विरोधात पोलीस ठाणे भंडारा, अमरावती येथे तक्रार नोंदवून या नराधमाला अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अद्यापही शर्मा याच्याविरूद्ध कारवाई अद्यापही झालेली नाही. जवखेडे हत्याकांडातील गुन्हेगारांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी , राज्यात दलितांवर झालेल्या अन्यायाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, सदर खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, अहमदनगर जिल्हा दलित अत्याचार जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, जिल्हास्तरावर दलित अत्याचार निवारण समिती स्थापित करण्यात यावी, अत्याचारग्रस्त दलितांना पोलीस संरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन राज्य शासनाला जिल्हामार्फत पाठविण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत अमृत बंसोड यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)
दलितांवरील अत्याचार थांबविण्यासाठी भंडारा बंदची हाक
By admin | Updated: November 17, 2014 22:47 IST