बावनथडी धरण अद्याप ‘मृतसाठ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:02 AM2019-08-17T01:02:21+5:302019-08-17T01:02:54+5:30

बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे.

Bawanthadi dam still 'dead' | बावनथडी धरण अद्याप ‘मृतसाठ्यात’

बावनथडी धरण अद्याप ‘मृतसाठ्यात’

googlenewsNext
ठळक मुद्देपावसाची पाठ : २५ वर्षात पहिल्यांदाच असे चित्र

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. त्यामुळे यंदा बावनथडी प्रकल्प कोरडा तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तुमसर-मोहाडी व मध्यप्रदेशाला वरदान ठरणारा बावनथडी (राजीवसागर) धरणात पावसाळ्यातही मृतसाठाच असल्याची धक्कादायक माहिती आहे. धरणक्षेत्र तथा बावनथडी नदी उगम परिसरात पुरेसा पाऊस बरसला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धरणात पाणीसाठा झाला नाही. उपयुक्त साठ्यासाठी पुन्हा पाच सेंमी पातळी वाढण्याची आवश्यकत आहे. धरण क्षेत्रात केव्हा पाऊस बरसतो याची प्रतीक्षा शेतकरी तथा संबंधित अधिकारी वर्गाला आहे. गत २५ वर्षात बावनथडीला पावसाळ्यात पाणी नाही, असे चित्र पहिल्यांदाच दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे ३३ वक्राकार दरवाजे उघडण्याची वेळ प्रकल्प प्रशासनावर आली आहे तर दुसरीकडे बावनथडी धरणात अद्यापही मृतसाठा आहे. तुमसर-मोहाडी तालुक्यात सुमारे १७ हजार हेक्टर शेती सिंचनाची सोय एकट्या बावनथडी प्रकल्पावर पूर्ण होते. हा प्रकल्प पुर्णक्षमतेने भरला नाही तर भीषण स्थिती उद्भवण्याची चिन्हे आहे.

नदीजोड प्रकल्पाची गरज
वैनगंगा व बावनथडी या दोन प्रमुख नद्या आहेत वैनगंगा नदीवर गोसेधरण बांधण्यात आले. प्रकल्पाचे बॅकवाटर भंडारा शहरापर्यंत येते. भर उन्हाळ्यातही येथील जलस्तर कमी होत नाही. दुसरीकडे बावनथडी नदी पावसाळा वगळला तर आठ ते दहा महिने कोरडीच राहते. त्यामुळे नदीजोड प्रकल्प राबविण्याची गरज आहे. नदीजवळ प्रकल्प राबविल्यास बावनथडी नदीतही बाराही महिने पाणी खळखळत राहू शकते. त्यामुळे नदीवर सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. गरज आहे ती इच्छाशक्तीची.

बावनथडी नदी कोरडी पडण्याची भीती
वैनगंगा नदीला बावनथडी नदी बपेराजवळ येवून मिळते. वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे बॅरेज तयार करण्यात आले आहे. वैनगंगा नदीला या हंगामात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परंतु बावनथडी नदी मात्र कोरडीच असल्याचे चित्र आहे. पाऊस न बरसल्याने सर्वच जण हतबल झाले आहे. केवळ सिहोरा परिसरातील चांदपूर जलाशयातून पाणी विसर्ग करण्यात आले. आगामी काळात पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.

बावनथडी धरण परिसरात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणात मृतसाठा आहे. पाच सेंमीने पाणी पातळी वाढली तर उपयुक्त पाणीसाठा होईल. अद्याप येथे पावसाची प्रतीक्षा आहे.
-आर.आर. बडोले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प.
नैसर्गीक संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने रोजगार हमीची कामे करण्याची गरज आहे. पावसाअभावी शेती होणार नाही. त्यामुळे शासनाने आतापासूनच नियोजन करावे.
-डॉ. पंकज कारेमोरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस.

Web Title: Bawanthadi dam still 'dead'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.