पवनी : शहरातील विठ्ठल-गुजरी वॉर्डातील गणेश मंदिर ७०० वर्षे जुने आहे. या मंदिरातील पंचमुखी गणेशाची मूर्ती शमीवृक्षाच्या लाकडावर कोरलेली आहे. अन्य मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेल्या आहेत. पवनी शहराच्या इतिहासाचा अभ्यास करणारे प्रा. नामदेव हटवार यांच्या मते मूर्तीची स्थापना ११ व्या शतकातील आहे. मंदिर स्तंभाच्या चारही बाजूंना श्रीगणेशाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
पंचमुखी गणेश मंदिरातील पाचवी मूर्ती नैऋत्य दिशेला कोरली आहे. मूर्तीची उंची ३२ इंच असून, पूर्व-पश्चिम लांबी १७इंच, उत्तर-दक्षिण रुंदी १५ इंच आहे. मूर्तीच्या हातात लाडू व परशू स्पष्ट दिसतो. डोक्यावर मुकुट धारण केलेले आहे. नैऋत्य व पश्चिम दिशेच्या मूर्ती सरळ उभ्या असून, जमिनीत दीड फूट खोल आहेत. शेंदूर लावलेला असल्याने मूर्तीचे मूळ स्वरूप नीट दिसत नाही. मात्र मूर्ती आकर्षक आहे. उत्तरमुखी गणेशाचे मंदिर असून, समोर एक भव्य खांब आहे. अनेक पर्यटक नवसाला पावणाऱ्या श्री गणेशाचे दर्शन घेतात. पवनी शहरात ९०० पेक्षा जास्त मंदिर आहेत. गणेशोत्सव काळात अनेक जण पवनीला भेट देऊन श्रींचे दर्शन घेत असतात.
पवनी येथील पंचमुखी गणेश मंदिर जागृत देवस्थानांपैकी एक आहे. त्यामुळे गणेशोत्सवात या मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त होते. पवनी शहर भंडारा शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर असून, नागपूरवरून ८४ किलोमीटर अंतरावर आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. आपली मनोकामना पूर्ण करतात. नवसही फेडतात. विदर्भात पवनी येथील पंचमुखी गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. त्यात अन्य मंदिरांचाही समावेश आहे.
भट कुटुंबीयांचे कुलदैवतसर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री गणेश मंदिराची देखभाल अरविंद भट करीत आहेत. पूर्वी हे मंदिर कौलारू होते. अरविंद भट यांनी मंदिराच जीर्णोद्धार स्वखर्चाने केला. अद्यापही अरविंद भट हेच मंदिराची देखभाल करीत आहेत. सर्वांचे लाडके बाप्पा हे त्यांचे कुलदैवत आहे. पिढ्यानपिढ्या मंदिराची देखभाल भट कुटुंबीय करीत आहेत. पुढचा वारसा त्यांचे पुत्र नीरज भट चालवणार आहेत.