जवाहरनगर : राजेदहेगाव शेतशिवारातील गर्भावस्थावर आलेल्या भातपिकांना एकाच पाण्याची मागणी असताना पेंच प्रकल्प शाखा खरबी नाका यांनी पाणी पुरवठा केलेला नाही. परिणामी हातात आलेले धानपिक नष्ट झाले. मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत आज महसूल व पाटबंधारे विभागाचे अधिकारी राजेदहेगाव येथे धडकले. दोनही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी म्हटले. पेंच पाटबंधारे विभाग खरबी नाका अंतर्गत येत असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याचे काम खरबी नाका शाखेकडे असते. ऐन गर्भावस्थेत असलेल्या धान पिकांना एका पाण्याची आवश्यकता होती. राजेदहेगाव येथील १९५ शेतकऱ्याच्या पाण्याच्या मागणीनुसार या परिसरात पाणी उपलब्ध करून दिलेले नाही. याबाबद शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, खंड विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना दि.१० नोव्हेंबर रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते. त्याबाबत आजपावेतो कसल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. समस्याचे निराकरण न झाल्यामुळे पुन्हा निवेदन देणे शेतकऱ्यांना भाग पाडले त्यानुसार गावाचे सर्वेक्षण करून दुष्काळग्रस्त जाहीर करून प्रती हेक्टरी तीस हजार रूपये आर्थिक मदत तत्काळ जाहीर करावी व पेंच पाटबंधारे विभागाच्या ज्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भात पीक नष्ट झाले, अशा अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे. मागण्या मान्य न झाल्यास ५ डिसेंबर रोजी शाखा कार्यालय शाखा खरबी नाकावर शेतकऱ्यांचा बैलबंडीसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आज महसूल व पेंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी राजेदहेगावात दाखल झाले. यात पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. चोपडे, उपअभियंता किशोर गोन्नाडे, शाखा अभियंता गायधने, माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य मितेंद्र चवरे, प्रभारी तहसीलदार चंद्रकांत तेलन, मंडळ अधिकारी सोनवाने, तलाठी क्षीरसागर, पोलीस पाटील मधूकर ढोबळे यांचा समावेश आहे. यांनी पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले. चर्चेअंती शेतकऱ्यांनी उद्याच्या बैलबंडी मोर्चा मागे घेणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
आंदोलनाचा इशारा देताच अधिकाऱ्यांनी रात्र काढली जागून
By admin | Updated: December 6, 2014 01:02 IST