साकोली : पंचायत समिती साकोलीच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात आॅनलाईन गैरव्यवहार करून लाखो रुपयाची अफरातफर केल्याप्रकरणी खंडविकास अधिकारी यांनी सहा जणाविरुद्ध तक्रार दिली होती. पैकी या प्रकरणातील फरार सहाय्यक डाटा आॅपरेटर प्रशांत उसगावकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस या प्रकरणाची व ऊसगावकर यांच्या संपत्तीची चौकशी करीत आहेत.पंचायत समिती साकोलीच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात आॅनलाईन गैरव्यवहार केल्याप्रकरणी खंडविकास अधिकारी साकोली यांनी दि. १८ फेब्रुवारी रोजी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अल्का लोथे, तत्कालीन सहाय्यक डाटा आॅपरेटर प्रशांत उसगावकर व ज्यांच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात आले अशा एकूण सहा जणाविरुद्ध पोलीस स्टेशन साकोली येथे तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी लोथे यांना त्याचवेळी अटक केली. मात्र तेव्हापासून प्रशांत उसगावकर हा फरार होता.प्रशांतला शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या चार टीम तयार केल्या होत्या. मात्र प्रशांत पोलिसांना सापडेना. अखेर अठरा दिवसानंतर दि. ८ ला प्रशांत नागपूर येथे पोलिसांना गवसला. पोलिसांनी प्रशांतला अटक केली असून ध्या प्रशांत दि. १६ पर्यंत पोलीस कोठडीला आहे.तक्रार दिल्यापासून प्रशांत फरार असल्याचे पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अपूर्ण होता. मात्र प्रशांत सापडल्यामुळे या प्रकरणात अजून किती लोक गुरफटले आहेत याचाही पर्दाफाश होऊ शकतो. तसेच पोलिसांनी प्रशांतच्या संपत्तीची चौकशी करीत असून या प्रकरणी पोलिसांनी गोंदियावरून एक ट्रक ताब्यात घेतला आहे. साकोली पोलीस पुढील तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
सहाय्यक डाटा आॅपरेटर अखेर पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Updated: March 13, 2015 00:41 IST