आसगाव/पवनी : शिल्पा जांभुळकर या तरुणीच्या खूनप्रकरणी संतप्त जमावाने पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शनिवारला सकाळपासूनच वलनी चौरस्ता रोखून धरला. काहींनी रस्त्यावर टायर पेटवून निषेध नोंदविला तर काहींनी दगडफेक करुन पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्यामुळे घटनास्थळावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. सकाळी ११ पासून सायंकाळी ४ पर्यंत संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी रस्तारोको केल्याने लाखांदूर मार्गावरील वाहतूक पुर्णत: खोळंबली होती. तणाव कायम असतानाच पोलीस अधीक्षकांनी बीट जमादाराला निलंबित केल्याचे घोषित केल्यानंतर तणाव निवळला.आज शनिवारला सकाळपासून वलनी, आसगाव आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये या प्रकरणाविषयी असंतोष खदखदत होता. ग्रामस्थांनी स्वत:हून खैरी - दिवाण चौरस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी राज्य राखीव दलासह दंगा नियंत्रक पथकाला पाचारण केले होते. यावेळी पोलिसांनी मृतकाच्या कुटूंबियांची मनधरनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव जुमानत नसल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येणे कठिण झाली होती. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे परिस्थिती पुन्हा चिघळली. आणि नागरिकांनीही पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. यात पोलिस वाहनाच्या काचा फुटल्या. या झटापटीत रूपाली नेवारे आणि योगिता वाढई या पोलीस कर्मचारी जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यात आंदोलनकर्तेही जखमी झाले.दरम्यान, रास्ता रोको सुरू असलेल्या वलनी चौरस्त्यावर भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारस्कर, पवनीचे तहसीलदार नरेंद्र राचेलवार हे दाखल झाले. त्यांनी मृतकाच्या कुटूंबियांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव जुमानत नसल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. (वार्ताहर / शहर प्रतिनिधी)ठाणेदाराची बदली, हवालदार निलंबितयाप्रकरणात ठाणेदाराची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांच्यावर निलंबनाची मागणी केली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलीस अधिक्षक कैलास कणसे यांनी ठाणेदार राजेंद्र नागरे यांची तडकाफडकी भंडारा मुख्यालयात बदली केली. तर बीट जमादार फुलचंद सिंधीमेश्राम यांना निलंबित करण्यात आले. सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून दोषीवर तात्काळ कारवाई करण्याची ग्वाही जिल्हा पोलीस अधिक्षक कणसे यांनी नातेवाईकांना दिली. पोलिसांनी केले होते तक्रारीकडे दुर्लक्षवलनी येथील शिल्पा जांभुळकर या तरुणीचा खून वैमनस्यातून की एकतर्फी प्रेमप्रकरणातून हे गृढ कायम असले तरी आरोपी देवेंद्र गभणे याने तिला यापूर्वीच छळले होते. त्यानंतर त्याची पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. परंतु पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिल्पाला जीव गमवावा लागला. याप्रकरणाचे पडसाद संपूर्ण जिल्हाभरात उमटले असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत.
जाळपोळ अन् दगडफेक
By admin | Updated: February 22, 2015 00:21 IST