तुमसर-कटंगी आंतरराज्य मार्गावर बावनथडी नदीवरील पूल कमकुवत झाला आहे. नऊ महिन्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी मागणी केल्याने हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाली. परंतु पुन्हा एक आठवड्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या जवळ मोठी नाली खोदली. त्यामुळे हलक्या वाहनांचीसुद्धा वाहतूक बंद झाली. आंतरराज्य मार्ग असल्यामुळे तुमसर तालुक्यातील नागरिकांचे कटंगी, तिरोडी, बालाघाट, शिवनी येथे येणे-जाणे असते. मध्य प्रदेशातील नागरिकसुद्धा उपचारासाठी भंडारा, तुमसर, नागपूर येथे येतात. रुग्णवाहिकेची वाहतूकही येथे बंद करण्यात आली. त्यामुळे दोन्ही राज्यातील नागरिकात सध्या प्रचंड असंतोष आहे.
आष्टी, लोभी, पात्री, नाकाडोंगरी, चिखला येथील नागरिकांनी किमान हलक्या वाहनाला पुलावरून वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. लोभीचे माजी सरपंच सत्यनारायण अग्रवाल यांनी तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देण्यात येईल व पुलाचे नियंत्रण येथे स्वतः नागरिक करतील, असा इशारा दिला आहे.