▪ आवळी नदी घाटावरील घटना
२६ लोक ०६ के आवळी नदी घाटावरील घटना : रेती चोरीप्रकरणी तालुका प्रशासनाची संशयास्पद भूमिका
गावकऱ्यांच्या विरोधाला प्रशासनाची पाठ
लाखांदूर : नदीपात्रातून दिवस-रात्र रेतीचोरीप्रकरणी गावकऱ्यांनी जेसीबीसह काही टिप्पर व ट्रॅक्टर अडवून रेती चोरीला विरोध करीत प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली. मात्र, सदर मागणीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करून गावकऱ्यांच्या विरोधाला प्रशासनाने पाठ दाखवून कोणतीच कारवाई न केल्याने तालुका प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरल्याचा आरोप आवळी ग्रामवासीयांनी केला आहे.
तालुक्यातील आवळी, चिखलधोकडा या नदी घाटातून गत काही दिवसांपासून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रक, ट्रॅक्टर व टिप्परने चोरटी वाहतूक केली जात असल्याचा आरोप आवळी येथील गावकऱ्यांनी केला आहे. या अवैध वाहतुकीअंतर्गत नदी घाटातून एकाच रात्री लाखो रुपये किमतीच्या रेतीचा उपसा करून ट्रक, टिप्परने वाहतूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२५ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आवळी येथील जवळपास ५० गावकऱ्यांनी नदी घाटावर जाऊन रेतीचा अवैध उपसा व वाहतूक करणारी सर्व वाहने अडवून तालुका प्रशासनाला माहिती देत कारवाईची मागणी केली. मात्र, सदर वाहने अडविल्याची माहिती देऊनही तालुका प्रशासनातील कोणीही अधिकारी, कर्मचारी घटनास्थाळी न आल्याने तब्बल दोन तास प्रतीक्षेनंतर गावकऱ्यांनी हताश होऊन विनाकारवाई परतावे लागल्याची बोंब आहे. एकंदरीत नदीपात्रातून दिवसरात्र जेसीबी, ट्रॅक्टर, टिप्पर व ट्रकने रेतीचा अवैध उपसा व वाहतूक करताना गावकऱ्यांनी केलेल्या विरोधाला प्रशासनाने पाठ दाखविल्याने आवळीवासीयांत संतापाचे वातावरण दिसत असून तालुका प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरल्याचा आरोप केला जात आहे.
बॉक्स
रेती चोरीला कोणाचे अभय?
तालुक्यातील आवळी-चिखलधोकडा रेती घाटातून दिवस-रात्र रेतीचा अवैध उपसा व वाहतूकप्रकरणी आवळी येथील गावकऱ्यांनी वाहने अडवून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली. मात्र, प्रशासनाला माहिती देऊन तब्बल दोन तास लोटूनही तालुका प्रशासनातील कोणीही अधिकारी घटनास्थळाकडे न फिरकल्याने या रेती चोरीला कोणाचे अभय? असा संतप्त सवाल आवळीवासीयांतून केला जात आहे.
बॉक्स
नदीकाठावर ठिकठिकाणी रेतीचा अवैध साठा
दिवस-रात्र नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा करून ट्रक व टिप्परने रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी तालुक्यातील चिखलधोकडा नदीकाठावर ठिकठिकाणी अवैध रेतीसाठा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, येथील गावकऱ्यांनी रंगेहात अवैध रेती उपसा व वाहतूक करणारी वाहने पकडून तालुका प्रशासनाकडे कारवाईची मागणी करूनदेखील कोणी दखल न घेतल्याने अवैध रेतीसाठा जप्त कोण करणार? असा सवालदेखील केला जात आहे.