लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना रुग्णांची संख्या अलिकडे वाढत असून, कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या अतिनिकट संपर्कातील व्यक्तिंची शोधमोहीम (काॅन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक गतिमान करुन संपर्कातील व्यक्तिंचीही कोरोना चाचणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा दुरष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रोज सकाळी कोरोनाचा तालुकानिहाय आढावा घेतात. गुरुवारी झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सचिन पानझाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, गटविकास अधिकारी नूतन सावंत, डाॅ. माधुरी माथुरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते.
भंडारा आणि पवनी तालुक्यात रुग्णसंख्या अधिक आहे. कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या व्यक्तिंच्या संपर्कातील व्यक्तिंची चाचणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. काॅन्टॅक्ट ट्रेसिंग ४८ तासांच्या आत होणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष होता कामा नये. यासाठी विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांची मदत घेता येईल, असे ते म्हणाले.
बाॅक्स
लसीकरण केंद्राला भेट द्या
जिल्ह्यातील १२८ केंद्रांवर ४५ वर्षावरील सर्वांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. अधिकाधिक व्यक्तिंनी लस घ्यावी, यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथील अडचणी जाणून घ्याव्यात, असे आवाहन या बैठकीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देण्याची सूचनाही त्यांनी केली.
बाॅक्स
चिठ्ठीशिवाय पॅरासिटॅमल देऊ नये
डाॅक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय पॅरासिटॅमल आणि कफ सायरप ही औषधी मेडिकलमधून देऊ नयेत, अशी सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली. मेडिकल असोसिएशनच्या बुधवारी झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले तसेच औषधी दुकानांना भेट देऊन याबाबत खात्री करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.