बाजार समिती निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2017 12:22 AM2017-01-23T00:22:00+5:302017-01-23T00:22:00+5:30

तालुक्यातील प्रतिष्ठतेची समजल्या जाणाऱ्या लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ५ फेब्रुवारी होत आहे.

46 candidates in the fray in the market committee elections | बाजार समिती निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात

बाजार समिती निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात

Next

५ फेब्रुवारीला मतदान : भाजपाप्रणीत शेतकरी परिवर्तन पॅनेल आणि काँग्रेस राकॉ प्रणीत सहकार सुधार पॅनेल आमनेसामने
लाखांदूर : तालुक्यातील प्रतिष्ठतेची समजल्या जाणाऱ्या लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ५ फेब्रुवारी होत आहे. यात १९ संचालकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपा प्रणीत शेतकरी परिवर्तन पॅनेल आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत सहकार सुधार पॅनेल आमनेसामने असून दोन्ही पक्षातील काही असंतुष्टांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत आली आहे.
आता ४६ उमेदवार रिंगणात असून चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली असली तरी पणन व प्रक्रिया संघातून एका जागेसाठी कॉंग्रेस,राका आघाडी उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीचा बंडखोर उमेदवार उभा असल्याने आघाडीत बिघाडी तर होणार नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.दरम्यान भाजपने पणन व प्रक्रिया मतदार संघासाठी उमेदवारच दिला नसून अपक्षांमुळे अनेकांचे गणित बिघडणार आहेतलाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १९ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक होऊ घातली आहे. सेवा सहकारी संस्थामधून ११ संचालकाची निवड करावयाची आहे. यात आरक्षण जाहीर केला असून सर्वसाधारण गटातून ७ जागेसाठी एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा दिग्गज उमेदवार उभे असल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गज आणि काही नवीन चेहऱ्यांना दोन्ही पक्षाने संधी दिली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी चर्चेत असल्याने अधिक उत्पन्न देणारी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने या दोन्ही पक्षाची ताकत वाढली आहे. लाखांदूर तालुक्यात बऱ्याचशा ग्रामपंचायती आणि सेवा सहकारी संस्था काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मात्र काँग्रेस पक्षाचे १३ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ६ असे उमेदवार वाटप करण्यात आले आहे. आघाडी झाली असली तरी दोन्ही पक्षातील काहींना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
या अपक्ष उमेदवारांना शांत करून तेव्हा दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गटबाजी न करता काम केले तर सत्ता काबीज करण्यास हरकत नसल्याचे चिन्ह आहेत मात्र सध्या सर्वत्र भाजपाचा बोलबाला असल्याने शेवटी खासदार नाना पटोले आणि आमदार बाळा काशिवार यांच्या रणनीतीवर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार असल्याची चिन्हे आहेत. पणन व प्रक्रिया मतदार संघासाठी एकाने अपील केले होते. त्याचा निकाल १९ जानेवारीला देण्यात आला असून या जागेसाठी भाजपने आपला उमेदवार उभे केला नाही.
त्यामुळे काँग्रसचे उमेदवार यांना अविरोध निवडून येण्याची संधी होती मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असतानाही आघाडी उमेदवाराच्या विरोधात आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे सदर जागेसाठी दोन्ही उमेदवार आमनेसामने उभे आहेत. येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून प्रचाराचा शुभारंभ होताच निवडणुकीची रंगत वाढणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 46 candidates in the fray in the market committee elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.