निदानाची गरज : जनजागरणात सहभागी होण्याचे आवाहनलाखनी : तालुक्यात पंचायत समिती आरोग्य विभागाद्वारे आरोग्य शिक्षण जनजागरण मोहिमेद्वारे कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात बहुविध औषधोपचाराखाली क्रियाशील ४४ कुष्ठरोग असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद मोटघरे यांनी पत्रपरिषदेत दिली.तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा (वाघ) येथे १० रुग्ण, मुरमाडी (तुपकर) ११, पिंपळगाव (सडक) ८, पोहरा ८ व सालेभाडा आरोग्य केंद्रात ७ रुग्णावर कुष्ठरोगाचे औषधोपचार सुरु आहे. कुष्ठरोगाविषयी अद्यापही समाजात अनेक गैरसमजुती व अंधश्रद्धा आहेत. कुष्ठरोगावर कोणत्याही स्वरुपाची लस उपलब्ध नाही. रोगाचे तात्काळ निदान व निराकरण करण्यासाठी बहुविध औषधोपचार हाच एकमेव प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्याचे डॉ.मोटघरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. समाजात दडून राहिलेले कुष्ठरुग्ण स्वत: होऊन तपासली व औषधोपचारासाठी यावेत, यासाठी प्रत्येक नागरिकांनी लक्ष देणे महत्वाचे असल्याचे डॉ.मोटघरे यांनी सांगितले. एम.डी.टी. च्या नियमिता उपचाराने कुष्ठरुग्ण पूर्णपणे बरा होत असतो. ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक बुधवारला कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र कार्यान्वित असून कुष्ठरुग्णांची तपासणी, निदान, विकृती रुग्णासाठी भौतिकोपचार आरोग्य शिक्षण, व्यॉक्स थेरपी, मसल स्टीमुलेटर व जखमांवर उपचार केले जात असल्याची माहिती डॉ.मोटघरे यांनी दिली. पत्रपरिषदेला डॉ.डी.डी. अंबादे, डॉ.विजय भोजने, डॉ.सतीश मेश्राम, डॉ.अमेय धात्रक, विस्तार अधिकारी आय.ए. खान, कुष्ठरोग तंत्रज्ञ एन.आर. पाखमोडे, निरंजन पाखमोडे, निलेश गिरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
लाखनी तालुक्यात ४४ कुष्ठरुग्ण
By admin | Updated: October 4, 2014 23:22 IST