शेतकरी हवालदिल : दिघोरीतील प्रकारदिघोरी (मोठी) : परिसरातील शेतकऱ्यांचे १ कोटी ९९ लाख रूपयांचे चुकारे रखडले आहेत. आधी पावसाने दगा दिला व नंतर किडीने पीक नष्ट केले. आता धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांना त्यांच्या धानाच्या चुकाऱ्यांपासून वंचित ठेवत आहेत.शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये, धानाला योग्य तो भाव मिळावा या हेतूने शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र ही योजना अंमलात आणली. मात्र येथील शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रात धान विकून ४५ दिवसाचा कालावधी लोटला तरी अजूनपर्यंत धानाचे चुकारे मिळाले नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.दिघोरी (मोठी) येथे लक्ष्मी राईस मिल असोसिएशन व खरेदी विक्री संघाचे असे दोन आधारभूत धान खरेदी केंद्र दिवाळीनंतर सुरु झाले. यात खरेदी विक्री संघाच्या धान खरेदी केंद्रावर ७ जानेवारीपर्यंत ८,३१० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. लक्ष्मी राईस मिल असोसिएशनच्या खरेदी केंद्रावर ५,८२९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. दोन्ही धान खरेदी केंद्रावर १४ हजार १४० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. याचे एकुण मुल्य १ कोटी ९९ लाख रूपये एवढे होत असून धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनापासून शेतकऱ्यांना आजवर एकही रूपया मिळालेला नाही. एक एकराच्या सातबारा प्रमाणपत्रावर केवळ १२ क्विंटल धान विक्री करण्याची सक्ती असल्याने उर्वरीत धान खासगी व्यापाऱ्यांना मिळावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरीत धानाचे नुकसान सहन करावे लागेल. शासनाने प्रतिक्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केले असले तरी ते २०० रूपयांची धानविक्रीच्या पावतीवर नोंद नसल्याने बोनसचे पैसे मिळाले नाही. ते पैसे मिळणार की नाही, याविषयी शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. खरेदी विक्री व राईस मिल संघामार्फत खरेदी साठवणूक असलेले गोदाम निम्म्यापेक्षा जास्त भरलेले आहेत. गोदामाचे आवारात १० हजार पोती शेतकऱ्यांची पडून असल्याने या दोन्ही धान खरेदी केंद्रांना डिलीवरी आॅर्डर देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
१.९९ कोटींचे धान चुकारे अडले
By admin | Updated: January 10, 2016 00:42 IST